शोभना कांबळेरत्नागिरी : आरोग्य विभागाची १०८ रुग्णवाहिका रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरली आहे. कोरोना काळात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील १७ रुग्णवाहिकांमधून तब्बल ३६,७१३ रुग्णांना उपचारासाठी दाखल केले. यापैकी १५,६९१ कोरोना रुग्णांची रूग्णवाहिकांमधून ने - आण करण्यात आली.जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकेच्या नियोजनाची जबाबदारी कोल्हापूरचे विभागीय व्यवस्थापक डॉ. अरूण मोराळे, रत्नागिरीचे जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील आणि उपजिल्हा व्यवस्थापक विशाल पवार यांच्यावर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १०८ची सेवा १७ रुग्णवाहिका, ४० चालक आणि १८ डॉक्टर्स सांभाळत आहेत.कोरोना काळात १५,६९१ रुग्णांना दिले जीवनदानरुग्णांना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची मदत घेतली जाते. यंदा एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे कोरोनाच्या गंभीर रूग्णांची ने-आण करण्यासाठीही या सेवेचा उपयोग करण्यात आला. एप्रिल ते नोव्हेंबर या काळात या रूग्णवाहिकांनी १५,६९१ कोरोना रूग्णांना उपचार मिळवून दिले.अपघातातील रुग्णांचे वाचविले प्राणजिल्ह्यातील १७ रूग्णवाहिकांमधून गेल्या आठ महिन्यांत विविध अपघातांमधील १७८ अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळवून दिले. त्याचबरोबर हृदयरोग, भाजलेले, गंभीर इजा, प्रसुती यासाठीही १०८ रूग्णवाहिकेची मदत घेण्यात येते.डॉक्टर, कर्मचाऱ्यांची २४ तास सजग सेवाया रूग्णवाहिकेत असलेले डॉक्टर आणि कर्मचारी यांना सतत सजग राहावे लागते. त्यांना थांबण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात खोली दिली जाते. रुग्णाला हलविण्यासाठी १०८ सेवा हवी असल्यास पुणे येथील कॉल सेंटरकडे कळविले जाते. त्यावरून जिथे सेवा हवी आहे, तिथल्या रुग्णवाहिकेचे डॉक्टर यांच्याशी संपर्क केला जातो.
१०८ सेवेवर जीपीएस यंत्रणेचे नियंत्रण असते. रूग्णवाहिका मध्येच थांबली किंवा अधिक वेगाने जाऊ लागली तर मुख्य सेंटरला कळते. लागलीच त्याबाबत चालकाला फोन करून विचारणा केली जाते. विनाखंड सेवेसाठी सदैव दक्ष राहावे लागते.- डॉ. अरूण मोराळे,विभागीय व्यवस्थापक