रत्नागिरी : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात १०९ उपोषणकर्ते सरसावले असून यापैकी ३९ उपोषणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे. यापैकी सायंकाळपर्यंत ५ उपोषणे स्थगित करण्यात आली. कोकण आयुक्त कार्यालयासमोर २ आणि ठाणे येथील कोकण विभागाच्या कोकण महासंचालक कार्यालयासमोर १ उपोषण होणार आहे.२६ जानेवारी, १ मे आणि १५ ऑगस्ट या राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून विविध प्रलंबित असलेल्या विकासकामांच्या पूर्ततेसाठी किंवा समस्यांच्या सोडवणुकीसाठी शासकीय यंत्रणांच्या विरोधात उपोषण किंवा आंदोलने करण्यासाठी उपोषणकर्ते सरसावतात. यंदाही १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील १०९ जणांंची उपोषणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदविण्यात आली आहेत. यापैकी ३९ उपोषणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार असून उर्वरित उपोषणे विविध तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी होणार आहेत. शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत काही आंदोलकांनी आंदोलने स्थगित केली.जिल्हा प्रशासनाने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी उपोषणे होऊ नयेत, यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना त्यांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे तालुकास्तरावर तसेच विभागांकडून उपोषणकर्त्यांशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे बरीचशी उपोषणे मागे घेण्यात आली. उर्वरित आंदोलक मंगळवारी उपोषणाला बसणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात १०९ आंदोलनकर्ते सरसावले, उद्या स्वातंत्र्य दिनी करणार आंदोलने
By शोभना कांबळे | Published: August 14, 2023 6:27 PM