मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. जिल्ह्यातून २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्येक विद्यार्थ्यामागे ४१५ रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले होते. परीक्षा रद्द झाली असली तरी परीक्षा शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना परत करण्याबाबत शासनाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
नवीन शैक्षणिक सत्र जूनमध्ये सुरू झाले तरी कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन सुरू होते. नोव्हेंबरमध्ये नववी, दहावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. मार्चमध्ये परीक्षा असल्याने जेमतेम दीड ते दोन महिने वर्ग सुरू होते. त्यातच विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे सुरुवातीला परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मात्र, सीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य शासनानेही दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
जिल्ह्यातून नियमित २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी ४१५ रुपये शुल्क प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेण्यात आले होते. ८८ लाख ७१ हजार ८७० रुपये बोर्डाकडे जमा करण्यात आले आहेत. परीक्षा रद्द होऊनही परीक्षा शुल्क परत देण्याबाबत शासनाने अद्याप काहीच घोषित केलेले नाही. परीक्षा शुल्काची रक्कम परत मिळणे अपेक्षित असून, नवीन शासन निर्णयाकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. याबाबत बोर्डाकडून लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे.
जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी ऑनलाइन अध्यापनच सुरू होते. कोरोनामुळे नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. मात्र, जेमतेम दीड ते दोन महिनेच शाळा होत्या. परीक्षा रद्द केल्याने शासनाने परीक्षा शुल्क परत करणे गरजेचे आहे.
-तनुश्री गुरव, विद्यार्थिनी
शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. मात्र, अद्याप गुणांकन किंवा अकरावी प्रवेशाबाबत काहीच जाहीर केलेले नाही. परीक्षा नाही, त्यामुळे शुल्क तरी परत देणार की नाही, याबाबत तरी लवकर निर्णय जाहीर करणे आवश्यक आहे.
-सायली आंबेकर, विद्यार्थिनी
सीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द केल्यानंतर शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. परीक्षा होणार नसल्याने परीक्षेसाठी घेतलेले शुल्क परत करणे आवश्यक आहे. याबाबत योग्य व रास्त निर्णय अपेक्षित आहे. प्रवेश परीक्षेचा तिढाही सोडवावा.
-शुभंकर देसाई, विद्यार्थी
दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोरोनामुळे शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. परीक्षा शुल्क परत करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून अद्याप कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. वरिष्ठ स्तरावरून सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याची तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनानुसार गुणांकन किंवा अकरावी परीक्षेसाठी सीईटी परीक्षेबाबतही अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.
-निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी