दापोली : तालुक्यात उन्हवरे, फरारे, वावघर या खाडीपट्टा परिसरात मुसळधार पावसामुळे जवळपास १० ते १५ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील धान्य, कपडे आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यावरही काही ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. या सगळ्या भागाची पाहणी आमदार योगेश कदम, तहसीलदार वैशाली पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन केली आहे.
यावेळी महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तहसीलदार वैशाली पाटील यांनी पंचनामे पूर्ण करुन तत्काळ अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त घरांना आपण शासनाकडून जास्तीतजास्त आर्थिक मदत मिळवून देऊ, अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी दिली आहे. या भागातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. दरम्यान, या परिसरातील खाडीमधील गाळ काढणे, धूपप्रतिबंधक बंधारा बांधणे यासाठी प्रयत्न करून संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर योग्य त्या उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी आमदार योगेश कदम प्रयत्नशील आहेत. याेगेश कदम यांनी ग्रामस्थांजवळ संवाद साधून त्यांना धीर दिल्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे यांनी सांगितले.
----------------------
दापाेली तालुक्यातील उन्हवरे खाडीपट्टयातील नुकसानग्रस्त भागाची आमदार याेगेश कदम यांनी पाहणी केली. यावेळी तहसीलदार वैशाली पाटील उपस्थित हाेत्या.