रत्नागिरी : स्किममध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगून मुंबईतील एका महिलेने फिर्यादीकडून वेळोवेळी असे एकूण ११ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार रत्नागिरीत उघड झाला आहे. फसवणुकीची ही घटना २० जानेवारी २०२२ ते ७ जून २०२३ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी मुंबईतील एका महिलेविराेधात रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित महिलेने फिर्यादीला फोन करुन आपले खडकपाडा कल्याण, मुंबई येथे साई अॅडवायसरी अँड इनव्हेस्टमेंट नावाचे ऑफिस असल्याचे सांगितले. फिर्यादीला ‘अल्गो ऑप्शन स्ट्रॅटेजी मॉड्युल अर्न’ या स्किममध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवत फिर्यादीने त्या स्किममध्ये वेळोवेळी असे एकूण ११ लाख रुपये भरले. परंतु, संशयित महिलेने या व्यवहाराबाबत फिर्यादी यांना कोणताही एम.ओ.यु करुन दिलेला नाही. तसेच फिर्यादीला रकमेच्या परताव्याची खात्री म्हणून धनादेशही देण्यात आलेला नाही.
दरम्यान, फिर्यादीने संशयित महिलेकडे गुंतवणूक केलेल्या रकमेचा वारंवार पाठपुरावा केल्यावर तिच्याकडून कोणतीही हमी मिळत नसल्याचे सांगितले. तसेच रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने बुधवारी (७ जून) शहर पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. याप्रकरणी संशयित महिलेविरोधात भारतीय दंड विधान कायदा कलम ४०६,४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.