रत्नागिरी : जिल्ह्यात क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम जुलै ते ऑक्टोबर २०२१ आणि डिसेंबर ते मार्च २०२२ अशा दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून एकूण १३ लाख ५७ हजार ६० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील संपूर्ण तर शहरी भागातील ३० टक्के लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी १,१०७ पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
१ जुलै २०२१ ते ३१ मार्च, २०२२ देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महाेत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध व नियमित संनियंत्रण कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात मोहीम राबवण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेत जिल्ह्यातील प्रत्येक घरोघरी जाऊन क्षयरोग व कुष्ठरोगाविषयी तसेच या आजारांच्या सेवासुविधांविषयी माहिती देऊन संशयित रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.
या मोहिमेत निदान झालेल्या क्षयरुग्णांना निक्षय पोषण योजनेअंतर्गत उपचार सुरू केले जाणार आहेत. हे उपचार सुरू असेपर्यंत पोषक आहारासाठी दरमहा ५०० रुपये अनुदान रुग्णांना बँक खात्यावर जमा करण्याचे प्रयोजन राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. आशांमार्फत प्रत्येक घरातील महिलांची तपासणी तर पुरुषांची तपासणी पुरुष स्वयंसेवक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात आपल्या घरी येणाऱ्या पथकास सर्वतोपरी सहकार्य करून क्षयरुग्णांना लवकरात लवकर उपचार सुरू करण्यास मदत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत केले आहे. या मोहिमेचे नियोजन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.
----------------------------
क्षयरोगाच्या लक्षणांबाबत विचारणा करणार
कोविड महामारीमुळे उपचारांसाठी न आलेल्या संशयित क्षयरुग्णांची निदान निश्चित करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. क्षयरोगासाठी २ आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, दोन आठवड्यांपेक्षा जास्त ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणेे, मानेवरील गाठ अशा लक्षणांबाबत विचारणा करण्यात येणार आहे. यापैकी लक्षणे आढळल्यास दोन थुंकी नमुने घेऊन आणि एक्स-रेकरिता संदर्भित करून तपासणीअंती निदान निश्चित करण्यात येणार आहे.