रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी १०० टक्के प्रगत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात ११५४ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी १०० टक्के प्रगत करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. रत्नागिरी जिल्हा राज्यात अग्रणी असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. शिक्षण आयुक्तांनी ज्ञानरचना वादानुसार शिक्षण पध्दतीचा वापर करुन राज्यातील किती शाळा प्रगत झाल्या याचा आढावा घेतला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ८०० पेक्षा जास्त शाळा १०० टक्के प्रगत ठरल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ८०० शाळांमधील विद्यार्थी प्रगत झाले आहेत. या कामगिरीबद्दल आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे सर्वशिक्षा अभियानांतर्गत केलेल्या कार्याबद्दल कौतुक केले. जिल्ह्याने पहिल्या दोन क्रमांकात स्थान पटकावले आहे. ही परंपरा कायम राखत शिक्षणामध्ये जिल्ह्यातील मुले राज्यात हुशार असल्याचे स्पष्ट होत आहे. रत्नागिरीतील शाळांनी राबविलेली शिक्षण पध्दती अन्य जिल्ह्यांतील शिक्षकांसाठी खुली करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील वहाळ बीटमधील ३० प्रगत शाळांना भेट देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिक्षकांचे दौरे सुरु झाले आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञान, आकलन, उपयोजन क्षमतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध कृती, उपक्रम, प्रयोग, प्रात्यक्षिके, प्रकल्प, स्वाध्याय, तोंडी काम, लेखी चाचणी याद्वारे विद्यार्थ्यांच्या संपादनाची वेळावेळी पडताळणी शाळास्तरावर करुन त्यांना प्रगत बनविण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. ज्ञानरचनावादाचा अवलंब करुन जिल्ह्यात एकूण ११५४ शाळा प्रगत झाल्या आहेत. त्यामध्ये मंडणगडात ८५, दापोलीत ८०, खेडमध्ये ९४, चिपळुणात १९५, गुहागरात १०२, संगमेश्वर २१६, रत्नागिरीमध्ये १८१, लांजात ७७ व राजापूरमध्ये १२४ शाळा प्रगत झाल्या आहेत. (शहर वार्ताहर)
११५४ शाळांमधील विद्यार्थी प्रगत
By admin | Published: April 03, 2016 3:50 AM