गुहागर : दिवसभर बंद असणाऱ्या घरांची टेहाळणी करत भरदिवसा घरफोड्या करणारा परशुराम विलास शेंडगे (रा. झोंबडीफाटा, गुहागर) याला गुहागर न्यायालयाने गुहागर तालुक्यात केलेल्या तीन घरफोड्यांच्या खटल्यामध्ये १२ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर गुहागरात ६ तर मुंबईत १० घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.परशुराम शेंडगे हा दिवसाढवळया घरफोड्या करत असे. सन २०१४पासून त्याने मुंबईत १० तर गुहागर तालुक्यात तब्बल ६ घरफोड्या केल्या आहेत. शृंगारतळी ते आबलोली रस्त्यावरील बंद घरांची तो दुचाकीवरून टेहाळणी करत असे. त्यानंतर घरात कोणीही नसताना कटावणी, स्क्रू ड्रायव्हर व पान्याच्या सहाय्याने घराचे कुलप व कडीकोयंडा तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, भांडी, वस्तूंची चोरी करीत असे. त्याला गुहागर पोलिसांनी सन २०१५मध्ये अटक केले होते.
शेंडगे हा चोरी करताना कोणताही पुरावा मागे न ठेवता, सराईतपणे घरफोड्या करीत असे. गुहागर पोलिसांना तो वेळोवेळी चकमा देऊन आपण काहीच करीत नसल्याचा आव आणत असे. अखेरीस गुहागर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा, रत्नागिरी यांचे मदतीने त्याच्यावर पाळत ठेवून आधुनिक तंत्राचा वापर करून त्याला अटक केली. त्यानंतर बोलण्यात निष्णात असलेल्या या आरोपीकडून चोरी केलेला माल हस्तगत करण्यात गुहागर पोलिसांना यश आले होते.या गुन्ह्यांचा अधिक तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर, विद्यमान पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम, जयंत शिंंदे, हेडकाँस्टेबल भास्कर मुंडोळा, तपास पथकातील पोलिस नाईक, शिपाई यांनी सखोलपणे करत परिपूर्ण पुरावे गोळा केले.
सरकारी वकील होडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून चोरीप्रकरणी परशुराम शेंडगे याला १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.पैरवी अधिकारी पोलीस शिपाई जाधव यांनी फिर्यादी, साक्षीदार, पंच तसेच इतर पुरावे न्यायालयासमोर सादर केले. या खटल्यात सरकारी पंचांची साक्षही महत्त्वाची ठरली.तालुक्यात अनेक ठिकाणी मारला डल्लापरशुराम याने १७ आॅक्टोबर २०१४ रोजी शृंगारतळी-आबलोली रस्त्यालगत असलेल्या दत्ताजी आंबवकर यांच्या घरातील सुमारे १९ तोळे सोने असा ५ लाख ५० हजार रूपये किंंमतीचा मुद्देमाल, १७ जानेवारी २०१७ रोजी शीर - मधलीवाडी येथील मनोहर गुहागरकर यांच्या घरातील सोन्याचे ६ ग्रम वजनाचे दागिने व देव्हाऱ्यातील सुमारे ३२० ग्रॅम वजनाची चांदीची भांडी असा सध्याच्या भावाप्रमाणे १ लाख किंंमतीचा मुद्देमाल तर ६ मे २०१६ ते १२ जून २०१६ या मुदतीत शीर आंबेकरवाडी येथील रूस्तम मौला मुल्ला यांच्या घरातील सोन्याची चैन, कर्णफुले, सोन्याच्या २ अंगठ्या असे सुमारे ३ तोळे सोन्याचे दागिने सध्याच्या भावाप्रमाणे ९० हजार किंंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता.