रत्नागिरी : शेतकऱ्यांकरिता कृषी पंपासाठी सुरु असलेल्या कृषी संजीवनी योजनेंतर्गत कोकण परिमंडलातील तीन हजार ३६४ शेतकऱ्यांकडे १२ लाख १ हजार २३७ रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. १ जुलै ते ३१ डिसेंबरअखेर बिल भरणाऱ्या ग्राहकांना एकूण बिलाच्या ५० टक्के सवलत महावितरणने जाहीर केली आहे.कृषी संजीवनी योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील १५५४ ग्राहकांकडे ६ लाख ४२ हजार ११३ रुपयांची थकबाकी आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८१० ग्राहकांकडे ५ लाख ५९ हजार १२४ रुपयांची थकबाकी राहिली आहे. कृषी पंपाचे बिल त्रैमासिक पद्धतीने देण्यात येते. परंतु तेही शेतकऱ्यांकडून भरण्यासाठी विलंब होत असलेला दिसून येत आहे. चिपळूण विभागामध्ये ४७६ ग्राहकांकडे २ लाख ७ हजार २१४, खेड विभागातील ४५७ ग्राहकांकडे २ लाख ८ हजार ५८६, रत्नागिरी विभागामध्ये ६२१ ग्राहकांकडे २ लाख २६ हजार ३१३ रुपयांची थकबाकी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विभागात ८५७ ग्राहकांकडे २ लाख ६१ हजार २९४, तर कणकवली विभागात ९५३ ग्राहकांकडे २ लाख ९७ हजार ८२९ रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. १० टक्के ग्राहक थकबाकीदार असून, ९० टक्के ग्राहकांकडून नियमित वीजबिल भरण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.कृषी संजीवनी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शेतकरी बिलाची ५० टक्के रक्कम भरु शकतात किंवा २० टक्केप्रमाणे दोन हप्ते व १० टक्क्याने एक हप्ता भरण्याची सुविधा महावितरणने देऊ केली आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. पैसे न भरून कारवाई होण्यापेक्षा त्यांनी बिले भरून सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
कोकण परिमंडलात १२ लाख थकबाकी
By admin | Published: September 05, 2014 10:45 PM