पाली : ग्रामीण भागात नियमांचे पालन करत शिमगोत्सव सुखरूपपणे पार पडला असला तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागाला तडाखा द्यायला सुरुवात केली आहे. गेल्या सात दिवसांच्या फरकात पाली भागात तब्बल १२ कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्याने या भागाची चिंता वाढली आहे.
सद्यस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे काम खानू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु आहे. स्थानिक पातळीवर यासंबंधी जनजागृती केली जात आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रात ग्रामस्थांची गर्दी होत आहे. लसीकरण सुलभ व्हावे, या हेतूने आरोग्य केंद्रातर्फे चरवेली उपकेंद्रातही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरणाच्या कामाने वेग घेतला असतानाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णही वाढत आहेत. गेल्या सात दिवसांत पाली, खानू आणि कापडगाव या तीन गावांमध्ये एकूण १२ रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये पालीमध्ये सात, कापडगावमध्ये चार आणि खानूमधील एका रुग्णाचा समावेश आहे. या बारापैकी ११ पॉझिटिव्ह स्थानिक असून, एक मुुंबईस्थित आहे. तो शिमगोत्सवाला गावी आलेला होता.
या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी या शिक्षकांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला होता. ज्या गावांमध्ये रुग्ण सापडले आहेत. तेथील ग्रामपंचायती सतर्क झाल्या असून, संबंधित पदाधिकाऱ्यांनी त्या त्या भागात जाऊन तेथील ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.