रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, अर्ज भरण्याची मंगळवारी अंतिम मुदत हाेती. या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी, मंगळवारी रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव, फणसोप, पोमेंडी बुद्रुक आणि चरवेली या चार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकूण अर्ज ११, तर सदस्य पदासाठी एकूण अर्ज १२५ आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यातीलही शिरगाव, फणसोप, पोमेंडी बुद्रुक आणि चरवेली या चार ग्रामपंचायतींत सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी २१ सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी (दि. २७) अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती.
शेवटच्या दिवशी तालुक्यातील चरवेली ग्रामपंचायतीत एकूण नऊ अर्ज दाखल झाले. यात सरपंच पदासाठी एक आणि सात सदस्यांच्या जागेसाठी आठ अर्ज आले आहेत. फणसोप ग्रामपंचायतीचे ३० अर्ज दाखल झाले असून, सरपंच पदासाठी दोन आणि सदस्यांच्या ११ जागासांठी २८ अर्ज आले आहेत.
पोमेंडी खुर्द ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी एकूण ४१ अर्ज दाखल झाले असून, सरपंचाच्या एका जागेसाठी चार आणि सदस्यांच्या ११ जागांसाठी ३७ अर्ज आले आहेत. शिरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ५६ अर्ज आले आहेत. सरपंचाच्या जागेसाठी ४ आणि सदस्यांच्या १७ जागांसाठी ५२ अर्ज आले आहेत.
२८ रोजी अर्जांची छाननी होणार असून, ३० रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. मतदानाची तारीख बदलली असल्याने आता १३ ऑक्टोबर ऐवजी १६ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, तर १६ ऐवजी १७ रोजी मतमोजणी होणार आहे.