रत्नागिरी : हरियाणातून गोव्यात गॅसऐवजी बेकायदेशीररीत्या ३५ हजार लिटर्स स्पिरीट वाहून नेणारा टॅँकर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रविवारी पकडला. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील पाली जुना मठ येथे ही कारवाई करण्यात आली आली. जप्त केलेल्या स्पिरीटचे मूल्य साडेसतरा लाख रुपये असून तीस लाख किमतीचा टॅँकरही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. विजयकुमार जॉन विलियम्स (वय ४२) व हरीष देवराज रॉवलिन्सन (२९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नाताळ आणि वर्षअखेरच्या कार्यक्रमांची गोव्यात जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठीच मद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. बारदेश, गोवा येथे मद्यासाठी लागणाऱ्या स्पिरीटची गॅसच्या टॅँकरमधून बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. इंडियन आॅईल एल. पी. गॅस सिलिंडरचे चित्र असलेला केए-१९ डी ६४७८ हा टॅँकर पाली मठ येथे आल्यानंतर अडविण्यात आला. चालकाकडील कागदपत्रे तपासण्यात आल्यावर त्या कागदपत्रांनुसार टॅँकरमध्ये १६,३१० किलो प्रॉपिलिन गॅस हरियाणा ते बारदेश, गोवा असा वाहून नेत असल्याचा उल्लेख होता. प्रत्यक्षात गॅसच्या नावाखाली स्पिरीटची वाहतूक करण्यात येत होती. उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांसह पेट्रोल पंपावर या टॅँकरमधील द्रव्याची तपासणी केली असता त्यात स्पिरीट असल्याचे स्पष्ट झाले. पानिपत हरियाणामधून हा टॅँकर आला होता. विनापरवाना स्पिरीट गोव्यात नेऊन त्याचे मद्य तयार केले जाते आणि महाराष्ट्रात कर चुकवून कमी दराने त्याची विक्री होत असल्याची माहिती खबऱ्याकडून विभागाला मिळाली होती. या अवैध धंद्यात हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, दिल्ली, गोवा, महाराष्ट्र असे मोठे रॅकेट गुंतलेले आहे. ही कारवाई विभागीय आयुक्त संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी विभागाचे अधीक्षक संतोष झगडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने भरारी पथकाचे निरीक्षक मुकुंद बिलोलीकर, सुभाष जाधव, दुय्यम निरीक्षक बाळासाहेब जाधव, दिगंबर शेवाळे, सूरज दाबेराव, जितेंद्र पवार व जवान यांनी केली. (प्रतिनिधी)
साडेसतरा लाखांचे स्पिरीट जप्त
By admin | Published: December 23, 2014 12:50 AM