चिपळूण : कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोलिसांसाठी राखीव १५ बेड व रुग्णवाहिका ठेवावी, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सैफ सुर्वे यांनी संस्थापक राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांसह रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात अनेक लोकांना चांगली सुविधा मिळत नसल्याचे आढळून येते. त्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त आरोग्य यंत्रणा कशी वाढवता येतील, बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर हे जास्तीत जास्त कसे उपलब्ध होतील. लोकांमध्ये जनजागृती कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावे. त्यात पोलिसांसाठी प्रत्येक तालुक्यात कमीत कमी १५ बेड सर्व सोयींसह राखीव ठेवावेत व प्रत्येक सरकारी कोविड सेंटरच्या बाहेर एक रुग्णवाहिका पोलिसांसाठी असणे गरजेचे आहे, असे सुर्वे यांनी निवेदनात म्हटले आहे.