दस्तुरी : केंद्र शासनाच्या नवीन राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत योजनेत खेड तालुक्यातील ११ गावांमधील १५ जणांनी बायोगॅस प्रकल्प उभारून ऊर्जानिर्मिती केली आहे. यासाठी १ लाख ८१ हजार रुपयांचा निधी खर्ची पडला आहे.
स्वयंपाक व इतर घरगुती उपायासाठी बायोगॅस वापर करून यांचे जळक्या लाकडाच्या धुरापासून संरक्षण करणे, सरपणासाठी पडणाऱ्या कष्टापासून सुटका व त्यासाठी लाकूडतोड थांबवून पर्यावरणाचे संरक्षण, शौचालयाची जोडणी बायोगॅस संयंत्रात करून उघड्यावरील शौचापासून मुक्तता, वाढत्या गॅस सिलिंडरच्या खर्चातून बचत करणे व सेंद्रिय खत तयार करून रासायनिक शेतीपासून मुक्तता मिळवण्यासाठी शासनाकडून ही योजना राबविण्यात आली. येथील पंचायत समितीच्या कृषी विभागाला गतवर्षी १५ लाभार्थ्यांचे देण्यात आलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये इतर लाभार्थ्यांची १४ व अनुसूचित जातीतील एका लाभार्थ्यांचा समावेश आहे.