देवरूख : मुसळधार काेसळणाऱ्या पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी - भेंडीचा माळ येथे शुक्रवार, २३ जुलै रोजी डोंगर खचण्याबरोबरच जमिनीला भेगा पडल्याने १६ घरांना धोका निर्माण झाल्याने या कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कळकदरा ते ओझरे मार्गावरील रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. तसेच आंबा घाटात मोठी दरड खाली आल्याने मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पुराच्या पाण्याने कनकाडी व दाभोळे - सुकमवाडी येथील पूल वाहून गेल्याने या गावांचा नजीकचा संंपर्क तुटला आहे.
मुर्शी - भेंडीचा माळ येथे शुक्रवारी सकाळी सभापती जयसिंग माने यांनी घटनास्थळाला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. येथील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्याबरोबरच अन्नधान्याची व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत माजी सरपंच मंगेश दळवी, तलाठी पवार, ग्रामसेवक शिंदे व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
आंबा घाटात दरड कोसळण्याची मालिका सुरूच आहे. दख्खन गावाजवळ दोन ठिकाणी दगड व माती थेट मार्गावर आली आहे. यामुळे रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कळकदरा ते ओझरेपर्यंतचा मार्ग अनेक ठिकाणी खचल्याने या मार्गावरून प्रवास करणे जीवघेणे झाले आहे. साखरपा - गुरववाडी येथेही दरड कोसळल्याने मार्ग बंद आहे.
दख्खन - माईनवाडी येथे कमलाकर माईन यांच्या घर व गोठ्यावर दरड कोसळून ४ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. या कुटुंबीयांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. अतिवृष्टीने कसबा येथील निसार शेख, निझामुद्दीन शहा, इस्माईल गुजराणी, समीर गुजराणी यांच्या घरांना तडे जाण्याबरोबरच जमिनीला भेगा पडल्या आहेत. या कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मुर्शी - गाडेवाडी येथे संतोष गाडे, शांताराम गाडे, सचिन गाडे यांची घरे खचून घराला तडे गेले आहेत. अन्य ६ घरांनाही धोका निर्माण झाला आहे.
तसेच पांगरी येथील गोपीनाथ म्हादे, आंगवली येथील महेश अणेराव, कारभाटले येथील भगवान पवार यांच्या घराचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. पाचांबे गावाकडे जाणारा पाटबंधारे विभाग हद्दीतील रस्ता खचला आहे. देवरूख - मारळ मार्गावर निवे खुर्द येथे पुलावर चिखल साठल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याची मोहीम हाती घेऊन ती सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात आली. दाभोळे सुकमवाडी - सोनारवाडीला जोणारा लोखंडी साकव अणि देवरूख पर्शरामवाडी - कनकाडी एरंडेवाडीला जाणारा लोखंडी साकव पुराच्या पाण्याने गुरूवारी मध्यरात्री वाहून गेला आहे. यामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे.
शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाल्याने तालुकावासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शास्त्री, सोनवी, गडनदीच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने संगमेश्वर, माखजन, फुणगूस बाजारपेठांमधील पाणी ओसरले आहे.