लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णसंख्या २३,६२६ झाली आहे. केवळ एप्रिल महिन्यातच ही संख्या ११,२५४ एवढी झाली होती. रुग्णसंख्या वाढली असली तरीही आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याने आतापर्यंत १६ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे. डिसेंबर महिन्यात रुग्णसंख्या कमालीची घटली होती. मात्र, शिमगोत्सवात मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांमुळे १८ मार्चपासून पुन्हा रुग्णवाढीचा आलेख वाढू लागला. एप्रिलमध्ये तब्बल ११ हजारपेक्षा अधिक रुग्ण वाढले. त्यातच उपचारासाठी उशिरा येणारे असल्याने त्यातून गंभीर हाेणाऱ्यांची आणि मृत्यूची संख्याही वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या ६५६ असून, त्यापैकी २८० केवळ एप्रिल महिन्यातीलच आहेत.
मात्र, एकीकडे कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न आणि त्यामुळे बाधितांची कोरोनावर यशस्वी मात ठरल्याने आतापर्यंत १६ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एवढेच नव्हे, तर अनेकांची इच्छाशक्ती बळकट असल्याने अगदी ८० पेक्षा अधिक वयाच्या वृद्ध व्यक्तींनीही कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ६९ टक्के इतकी आहे.
तसेच आतापर्यंत झालेल्या पावणेदोन लाख कोरोना चाचण्यांपैकी १ लाख ३० हजार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळत आहे.
मी कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल कळताच माझ्या पायखालची जमीनच सरकली. ज्येष्ठांना कोराेनाचा धोका अधिक असतो म्हणतात. मात्र, त्यानंतर मी कोरोनाशी लढायचं ठरवलं. डाॅक्टर आणि आरोग्य कर्मचारी जसं सांगतील तसं करायचं ठरवलं. त्यामुळे पुढच्या काही दिवसांतच माझ्या तब्बेतीत फरक पडला. हळूहळू मला बरं वाटू लागल्याने माझ्यात जगण्याची इच्छाशक्ती वाढवली. मी ठणठणीत बरा झालो आहे.
- वसंत सराफ, चिपळूण
कोरोनाची सर्वांच्या मनात इतकी भीती आहे की तो झाला तर काय, या कल्पनेनेच जीव घाबरा होतो. माझ्याही बाबतीत तसं झालं. मला कोरोना झालाय, तोही ७० व्या वर्षी, या कल्पनेनेच आपण यातून वाचणार नाही, असं वाटत होतं. मात्र, डाॅक्टरांनी केेलेले प्रयत्न आणि त्यांच्या स्टाफनेही माझे मनोबल वाढविल्याने मी कोरोनामुक्त झालो आहे. गेल्या १५ दिवसांपासून मी माझ्या घरच्यांबरोबर आनंदाने राहत आहे. काेरोनाला मी हरविले आहे. म्हणूनच सांगावसं वाटतं, कोरोनाला घाबरू नका, त्याला हद्दपार करा.
श्रीनाथ ढेपसे, रत्नागिरी
मला ७१ व्या वर्षी काेरोना झाल्यामुळे घरच्यांना काळजी वाटत होती. मी आधी लस घेतल्यामुळे तसा फारसा त्रास होत नव्हता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथले डाॅक्टर आणि नर्स यांनी मला धीर दिला. माझ्या घरच्यांनाही धीर दिला. माझी काळजी घेतली. मी बरे झाले. त्यामुळे काेरोनाची भीती बाळगू नका. कोरोना बरा होतो. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर खचून जाऊ नका. त्याला धीराने सामोरे जा. तो आपोआप नष्ट होताे.
विमल चाचे, रत्नागिरी
जिल्ह्याचा पाॅझिटिव्ह रेटही कमी झाला
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात वाढलेली रुग्णसंख्या जिल्ह्यासाठी चिंता निर्माण करणारी होती. अगदी ८०० पर्यंत रुग्णसंख्या गेली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही संख्या कमी कमी होत असल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे आता थोडासा दिलासा मिळत आहे. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे संख्या वाढत होती. मात्र, आता लाॅकडाऊनमुळे कमी होत आहे. सध्या पाॅझिटिव्ह रेट १५.२९ टक्के इतका झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे संकट बिकट आहे; पण आपण त्याचा सामना धैर्याने करायला हवा, तरच निर्माण होणाऱ्या तणावावर नियंत्रण ठेवून मानसिक संतुलन ठेवता येईल. सकारात्मक विचार मनात आणणे गरजेचे आहे. नकारात्मक विचार, नकारात्मक बातम्या, व्हाॅटस्ॲपवरील मेसेज व बोलणे टाळायला हवे. कोरोना झाला तर काय, ऑक्सिजन मिळेल का मला, असे टोकाचे विचार टाळायला हवेत. असे विचार दूर सारण्यासाठी आपल्या छंदाला वेळ द्या. नवीन गोष्टी शिका. हिंमत ठेवा, आनंदी राहा. यातूनच नकारात्मक भावना, उदासीनता, भीती आपोआप दूर होईल.
डाॅ. अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ