लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : जिल्ह्यात येत्या १० ते १२ जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर आता या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी येथील प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. नद्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने शहरासह नदीकाठच्या सुमारे चार गावांतील १,६०८ नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतरित केले जाणार आहे.
तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या दृष्टीने तयारी चालवली आहे. यामध्ये एकूण ४ ठिकाणच्या ७८ हजार लोकसंख्येमध्ये ७ हजार २३७ घरे ही पूररेषेत येत आहेत. एकूण बाधित कुटुंबे १ हजार ४८८ इतकी असून, लोकसंख्या एकूण ३ हजार ६२५ इतकी आहे. त्यामधील १ हजार ६०८ जणांना निवारा केंद्रात व्यवस्था केली जाणार आहे.
यामध्ये खेर्डीतील २९८ जणांना मेरी माता हायस्कूल, शिगवणवाडी व मोहल्ला, दातेवाडी, देऊळवाडी, कातळवाडी येथील शाळांत स्थलांतरित केले जाणार आहे. मजरेकाशीतील ४० घरे पूररेषेत असून तेथील १६० जणांना तेथील मारुती मंदिर, उर्दू शाळेत तर नगरपरिषद क्षेत्रात ६ हजार ६५२ घरे पूररेषेत असून त्यातील २ हजार ५०० नागरिक हे पुरामुळे बाधित होणारे आहेत. यातील १ हजार जणांना पाग, ओझरवाडी, खेंड मराठी शाळा, युनायटेड हायस्कूल, डीबीजे महाविद्यालय, बांदल हायस्कूल, माटे, राधाताई लाड सभागृहात स्थलांतर केले जाणार आहे. मिरजोळी जुवाड बेटावरील ९० जणांना मिरजोळी प्राथमिक शाळेत तर सती चिंचघरीतील ९० जणांना तेथील सती हायस्कूलमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे.