चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण कामातील गुहागर ते रामपूर या पहिल्या टप्प्याला निधी मिळवून देऊन हे काम जवळपास पूर्ण होत आले असताना आमदार भास्कर जाधव यांनी रामपूर ते उक्ताड या दुसऱ्या टप्प्याच्या निधीसाठीही केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी १७१ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
गुहागर-विजापूर हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गामध्ये वर्ग करण्यात आला. तेव्हापासूनच या रस्त्याचे रुंदीकरणासहीत काँक्रिटीकरण करण्यात यावेत, यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार गुहागर ते रामपूर या पहिल्या टप्प्यासाठी केंद्र शासनाने, किंबहुना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी २७० कोटी रुपये मंजूर केले आणि हे काम सुरूदेखील झाले. सद्य:स्थितीत सुमारे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. हे काम सुरू असतानाच पुढच्या टप्प्यालाही निधी उपलब्ध व्हावा, जेणेकरून काम अर्धवट स्थितीत थांबू नये यासाठी जाधव यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी केवळ पत्रव्यवहार करून ते थांबले नव्हते, तर गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही त्यांनी याबाबतची मागणी केली होती. त्यालाही आता यश आले आहे.
केंद्र शासनाच्या अखत्यारितील विषय असतानाही मुंबई-गोवा असो वा गुहागर-विजापूर या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना निर्माण झालेल्या समस्या जाधव यांनी सोडविल्या. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी झालेले सर्वेक्षण हे चुकीचे आहे हे गडकरी पर्यायाने केंद्र शासनाला पटवून देऊन त्यांनी कापसाळ, कामथे, सावर्डे, खेरशेत आदी ठिकाणी नव्याने भुयारी मार्ग मंजूर करून घेऊन त्या त्या भागातील जनतेला मोठा दिलासा दिला. गुहागर-चिपळूण मार्गाच्या बाबतीतही शृंगारतळी बाजारपेठ असो वा उमरोली गावातील रस्त्याच्या उंचीचा प्रश्न स्थानिक व्यापारी व ग्रामस्थांनी मांडला. तेव्हाही रस्त्याच्या कामात बदल करायला लावून व्यापारी व ग्रामस्थांना न्याय दिला.