अडरे : तालुक्यातील कामथे प्रयोगशाळेत तपासलेल्या ३४१ पाणी नमुन्यांपैकी फक्त १८ नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये शिरगाव, वहाळ, रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत घेण्यात आलेले नमुने शुद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिन्याला प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ग्रामीण भागातील पाण्याच्या स्रोतांचे नमुने तपासले जातात. नोव्हेंबर महिन्यात चिपळूण तालुक्यातील ३४१ नमुने घेऊन कामथे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये १८ ठिकाणांचे पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक कर्मचारी पाणी पुरवठा करणाऱ्या साधनांमधून पाण्याचे नमुने गोळा करतात. यामध्ये सार्वजनिक विहिरी, तलाव, बोअरवेल्स, पाण्याची टाकी, नळपाणी पुरवठा करणारे नळ यांचा समावेश असतो. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या तपासणीत कमी पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे. ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे अनेक आजार होतात. त्यासाठी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पाणी शुद्धिकरणावर भर दिला जातो. तालुक्यातील कोणत्या गावामध्ये पाणी पिण्यास योग्य किंवा अयोग्य आहे हे या तपासणीनंतर समजून येते. ज्या गावात पिण्याच्या पाण्याचे दूषित स्रोत सर्वात जास्त आढळून आल्यास आरोग्य विभागाकडून त्या ग्रामपंचायतीला दुबार तपासणीसाठी सूचना केल्या जातात. कापरे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येथील निवळी गोवळवाडी, भिले कुंभारवाडी या भागातील पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. खरवतेअंतर्गत ओमळी बौद्धवाडी, दहिवली बुद्रुक निमेवाडी, गुळवणे गणेशवाडी, खरवते -बौद्धवाडी, दादर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आकले तळेवाडी, अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत वालोपे वरचीवाडी, गणेशवाडी भोगवाडी, सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कापसाळ फणसवाडी, आगवे हुमणेवाडी, हुमणेवाडी, फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत हडकणी बौद्धवाडी, डेरवण गुरववाडी, दुर्गेवाडी, कोलतेवाडी, तळवडे कवडेवाडी या वाड्यांतील पाण्याचे नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. वहाळ, रामपूर व शिरगाव या प्राथमिक केंद्राअंतर्गत घेण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याचे नमुने शुद्ध आहेत. ज्या गावात पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. अशा गावातील ग्रामपंचायतींना पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत दुबार तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. (वार्ताहर)
तालुक्यात ३४१पैकी १८ नमुने दूषित
By admin | Published: December 02, 2014 10:44 PM