गुहागर : गुहागर तालुक्यात बालकांच्या मोफत शिक्षण अधिनियम २००९ (आरटी) अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांना ८ वी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे यासाठी तालुक्यातील २५ शाळांना ८ वी चे वर्ग जोडण्यात आले होते. मात्र ८ वी साठी विज्ञान व गणित विषयासाठी आवश्यक बीएस्सी (बीएड) शिक्षकच उपलब्ध नसल्याने पालकांनी आपल्या पाल्यांचा हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. यामुळे तालुक्यातील २५ पैकी १८ शाळांची गळती झाली असून फक्त सात शाळांमध्येच आठवीचे वर्ग जोडले गेले आहेत.आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी शासनाने हा कायदा आणला. यासाठी ६ ते १४ वयोगटामधील मुलाना आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे, हा शासनाचा उद्देश आहे. मराठी शाळातून १ ली ते ७ वीपर्यंत वर्ग असल्याने ८ वी चा वर्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये गुहागर तालुक्यातून २५ शाळा पात्र ठरुन २६३ मुले गतवर्षी मराठी शाळेमधून ८ वी च्या वर्गामध्ये होती. अशा एका वर्गामध्ये ६१ पटसंख्या झाली तरच जादा शिक्षक मिळतो या निकषामध्ये तालुक्यातील एकाही शाळेचा वर्ग पात्र न ठरल्याने आहे त्याच शिक्षकामधून वर्ग घेण्यात आले.तसेच ८ वीसाठी विज्ञान व गणित विषय शिकविण्यासाठी बीएसस्सी (बीएड) या पदवीचा शिक्षक आवश्यक असूनही अशी शिक्षक भरती शासनाने केलेली नाही. यातूनच आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने पालकांनी जवळील हायस्कूलमध्ये प्रवेश घेणे पसंत केले. यामुळे २५ शाळांपैकी आता तालुक्यातील आठच शाळांमधून ८ वी चे वर्ग जोडण्यात आले आहे. अशीच स्थिती राहिल्यास यापुढे शाळांमधील वर्गही बंद होतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने या विषयाकडे वेळीच गांभीर्याने लक्ष पुरवण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)आठ शाळांत १४१ विद्यार्थी ज्या शाळांना आठवीचे वर्ग जोडण्यात आले आहेत, त्यामध्ये वेळंब शाळेत २६, धोपावे शाळा नं. १ - ३३, पाभरे शाळा १०, सुरळ मराठी शाळा ८, भातगाव शाळा ८, पडवे उर्दू शाळा ३७ व पिंपट शाळा १९ विद्यार्थी असे १४१ विद्यार्थी आहेत. वरिष्ठ पातळीवर २२ जूनपर्यंत अहवाल पाठविणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी डी. डी. इरनाक यांनी सांगितले.
गुहागर तालुक्यात १८ शाळांची गळती
By admin | Published: June 18, 2015 9:55 PM