रत्नागिरी : जिल्ह्यासाठी शासनाकडून १८ हजार कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून या लसीचे तालुक्यांना वाटपही करण्यात आले आहे. त्यामुळे कोविशिल्ड लसीकरणाचा दुसरा डोस लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
ही लस ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने या लसीच्या वाटपाचे नियोजन करुन मंडणगड तालुक्यासाठी ५०० डोस, दापोली, खेडसाठी प्रत्येकी २०००, गुहागर १४००, चिपळूण २८००, संगमेश्वर २६००, रत्नागिरी ३०००, लांजा १५०० आणि राजापूरसाठी २२०० डोस अशा प्रकारे वाटप करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून लाभार्थी दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. ही लस आल्याने त्याचा फायदा लाभार्थ्यांना होणार आहे. आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले असून, सोमवारपासून ही लस देण्यात येणार आहे.