वाटूळ : प्रहार अपंग क्रांती संस्था व रत्नागिरी जिल्हा अपंग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि़ २४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व बेमुदत उपोषण होणार असून, रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो अपंग बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत़रत्नागिरी जिल्ह्यातील अपंग बांधवांच्या समस्यांबद्दल मागील एक महिन्यापासून प्रहार अपंग क्रांती संस्था व जिल्हा अपंग समन्वय समितीकडून बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्राने मागणी करण्यात येत आहे़ परंतु, पत्राला कोणतेच उत्तर न आल्याने दिव्यांग २०१६ कायद्यान्वये आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी उपोषण करण्यात येणार आहे़ तसेच जागृती रॅली काढण्यात येणार आहे़.
राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रहार अपंग क्रांती संस्था राज्याध्यक्ष बापुराव काणे, कोकण विभाग अध्यक्ष सुरेश मोकल, जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष आनंद त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली याचे आयोजन करण्यात आले आहे़डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन दिव्यांग जागृती रॅली काढण्यात येणार आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅलीची समाप्ती करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ होणार आहे़.
रत्नागिरीमध्ये होणाऱ्या या मोर्चा व उपोषणाला जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपली ताकद व एकता दाखवून द्या असे आवाहन दिपक घाग, कोकण विभाग उपाध्यक्ष, शैलेश पोष्टुरे, जिल्हाध्यक्ष प्रहार अपंग क्रांती, अमित आदवडे, विजय कदम, अशोक भुस्कुटे, गौतम सावंत, राकेश कांबळे, विलास कदम, समाजसेवक युयुत्सु आर्ते, पत्रकार संघ अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कर्मचारी संघटना अध्यक्ष विलास गोरे यांनी केले आहे़.चिपळूणवरुन आंदोलनस्थळी येण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आलेलीआहे. ज्यांना या वाहनांनी प्रवास करायचा आहे त्यांनी अशोक भुस्कुटे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. चिपळूण ते रत्नागिरीपर्यंत प्रत्येक गावातून येणाऱ्या दिव्यांगांसाठी ही गाडी असणार आहे़