खेड (जि. रत्नागिरी) : स्किममधून कमी किमतीत शिलाई मशीन मिळवून देताे, नादुरुस्त घरांसाठी रक्कम उपलब्ध करून देताे, असे सांगून बीड येथील महाराष्ट्र क्रांती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाने खेडमधील ९९ महिलांना गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे.याप्रकरणी दाेघांविराेधात खेड पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी २ लाख २५ हजार ६०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. संदीप शंकर डाेंगरे (३२, रा. वाराणी, टी. ए. शिरूर-कासार, बीड) आणि बबन मारुती माेहिते (६०) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.या फसवणूकप्रकरणी अंकिता अनिल शिगवण (४८) यांनी फिर्याद दिली आहे. संदीप डाेंगरे याने आपण महाराष्ट्र क्रांती सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगून महिलांना कमी किमतीत शिलाई मशीन मिळवून देताे, नादुरुस्त घरांसाठी रक्कम उपलब्ध करून देण्याची स्किम सांगितली. त्यानंतर त्याने ९१ महिलांकडून प्रत्येकी १६०० रुपये असे एकूण १ लाख ४५ हजार ६०० रुपये जमा केले. मात्र, त्याने शिलाई मशीन दिली नाही आणि पैसेही परत केले नाहीत.त्याचबराेबर ८ महिलांना माेडकळीस व नादुरुस्त घरांसाठी रक्कम देताे, असे सांगितले. महिलांना पैसे देण्याच्या नावाखाली त्याने स्वत:च ८० हजार रुपये लाटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हे पैसे त्याला खेड व फुरूस येथील बँकेच्या शाखेतून देण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित व गाेरगरीब महिलांनी उदरनिर्वाहासाठी एखादा व्यवसाय व आपल्या स्वत:चे घर मिळावे, यासाठी रक्कम जमा केली हाेती. या महिलांच्या असहाय्यतेचा फायदा उठवून संदीप डाेंगरे व बबन माेहिते या दाेघांनी २ लाख २५ हजार ६०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
यापूर्वीही गुन्हा दाखलसंदीप डाेंगरे याने यापूर्वी ८४० महिलांना २१ लाख १८ हजाराला गंडा घातल्याचे समाेर आले आहे. याप्रकरणी त्याच्यावर खेड पाेलिस स्थानकात जुलै महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आणखी काही महिलांना त्याने गंडा घातल्याचे समाेर आले आहे.