लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील जालगाव, आसूद ग्रामपंचायतींनी विलगीकरण कक्ष सुरु केले असून, बुरोंडी, दाभोळ, हर्णै, केळशी, गिम्हवणे या ग्रामपंचायतींमध्ये कक्ष स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
गृह अलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरणासाठी दोन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना असे कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. १४ वा वित्त आयोग तसेच दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांच्या पुढाकारातून या कक्षासाठी निधी उभारावा, अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आल्यानंतर जालगाव ग्रामपंचायतीने स्वतःचा विलगीकरण कक्ष सुरु केला आहे. या कक्षामध्ये २० खाटा असून, राहण्या/जेवणासोबतच येथे करमणुकीची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
तालुक्यातील आसूद ग्रामपंचायतीनेही विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. याठिकाणी १५ बेडची सुविधा करण्यात आली आहे. ग्रामपंचायत व दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांच्या पुढाकारातून येथे वेगवेगळ्या सुविधा दिल्या जात आहेत. तालुक्यात सध्या हे दोन कक्ष सुरू असून, गिम्हवणे, बुरोंडी, दाभोळ, हर्णै, केळशी या पाच ग्रामपंचायतींमध्ये लवकरच असे कक्ष सुरु करण्यात येणार आहेत. त्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
तालुक्यात सुरू झालेल्या दोन कक्षांमध्ये लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना ठेवण्यात आले असून, एखाद्याला अधिक उपचारांची गरज भासली तर दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.