रत्नागिरी : विशेष रस्ता अनुदान आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत रत्नागिरी नगरपरिषदेसाठी अनुक्रमे १५ कोटी २२ लक्ष आणि ४ कोटी ७८ लक्ष अशा एकूण २० कोटी रूपयांचा निधीस युती सरकारने मंजुरी दिल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरीच्या काेकणच्या सर्वांगीण विकासासाठी युती सरकार कटिबद्ध असल्याचेही आमदार सामंत यांनी सांगितले.आमदार सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले युती सरकार हे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत - जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी युती सरकार कटिबद्ध आहे. रस्ते आणि राज्याची प्रतिमा यांचा फार जवळचा संबंध आहे. उत्तम रस्ते हे राज्याच्या विकासाचे निदर्शक असतात. चांगल्या रस्त्यांमुळे अर्थव्यवस्थेलाही गती प्राप्त होत असते, असे त्यांनी सांगितले.रत्नागिरी नगरपरिषदेला रस्त्यांसाठी १५ कोटी २२ लाखाचा निधी मिळाला असून, याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. हा निधी प्राप्त झाल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती प्राप्त होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.आमदार सामंत म्हणाले की, कोकणच्या विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासासाठी अधिकचा निधी मिळवून देण्यासाठी मी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आलेलो आहे. युती सरकार हे जनसामान्यांचे सरकार असल्याने येत्या काळामध्ये कोकणाला भरघोस निधी मिळणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.
कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी २० कोटींचा निधी मंजूर, उदय सामंत म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 5:48 PM