राजापूर : भातखरेदीच्या शासकीय दरामध्ये झालेल्या वाढीचा फायदा उठवत राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाकडे १ हजार क्विंटल भात विक्री केली आहे. या भात खरेदी-विक्रीच्या माध्यमातून यावर्षी २० लाख १८ हजार ६५४ रुपयांची उलाढाल झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी सुमारे सातशेहून अधिक क्विंटलची जादा भात विक्री झाली आहे.
अवकाळी पाऊस आणि क्यार वादळ यामुळे अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
लहरी पाऊस, मनुष्यबळाची कमतरता, मजुरी आणि यांत्रिक साधनांचे वाढते दर आदींमुळे भातशेती तोट्यात असल्याचे बोलले जाते. पावसाळी हंगामामध्ये राबूनही त्या तुलनेमध्ये उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातशेतीकडे पाठ फिरविली आहे. त्यातून, यापूर्वी हिरवेगार असलेले भातशेतीचे मळे अलीकडे पडीक असल्याचे चित्र दिसत आहे. भातशेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातशेती बंद करून रेशन दुकान तसेच बाजारपेठेतून तांदूळ खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. अशा स्थितीतही काही शेतकरी आजही भातशेती करतानाचे आश्वासक चित्र आहे.
शेतामध्ये पिकणारे भात शासनाकडून खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकणाऱ्या भातातून उत्पन्न मिळत आहे. यावर्षी आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळ त्यामध्ये नद्यांना आलेला पूर यामुळे भातशेतीचे अतोनात नुकसान झाले होते. अशा स्थितीमध्ये शासनाच्या भातखरेदीच्या दरामध्ये केवळ अठरा रुपयांची वाढ झाली असलेली तरी, आपद्ग्रस्त स्थितीमध्ये ही वाढ शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. याचा फायदा उचलत अनेक शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून भातविक्री केली.
तालुक्यामध्ये राजापूर खरेदी-विक्री संघाच्या पाचल आणि राजापूर येथील केंद्रावर भातखरेदी करण्यात आली.
चाैकट
राजापुरात ४८ शेतकरी ५२२.८५ क्विंटल भात
पाचल येथे ४२ शेतकरी ५७०.८० क्विंटल भात
एकूण १ हजार ९३ क्विंटल भात खरेदी
गतवर्षी ३६७.६० क्विंटल भात खरेदी