राजापूर : गेल्या काही दिवसांपासून राजापूर तालुक्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे. तालुक्यात रविवारी दुपारपर्यंत २८ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ३३५ पर्यंत जाऊन पोहोचला होता. गेल्या चार दिवसांत तालुक्यात दोनशेपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत.
तालुक्यात रविवारी जैतापूर येथे ७, ओणी ४, रायपाटण ग्रामीण रुग्णालय ७, राजापूर ग्रामीण रुग्णालय ६, सोलगाव ३ असे आरटीपीसीआर झालेले २७ रुग्ण तर लांजा येथे ॲन्टिजेन झालेला एक रुग्ण असे २८ रुग्णांचे प्रमाण होते.
तालुक्यात एकूण ८४५ रुग्ण सापडले असून, ४७६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. एकूण ३४५ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण २३६ गावांपैकी ८१ गावांतच कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. मृतांमध्ये २१ गावातील रुग्णांचा समावेश आहे. गतवर्षी मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मे महिन्यात तालुक्यातील विखारेगोठणे गावात पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर मागील वर्षभरात तीनवेळा राजापूर तालुका कोरोनामुक्त झाला होता. नंतर शिवाय प्रदीर्घकाळ एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीही आरोग्य यंत्रणा, तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन न थकता अहोरात्र मेहनत घेऊन आपली जबाबदारी बजावत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवताना पुन्हा एकदा राजापूर तालुका कोविडमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.