चिपळूण : महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण परशुराम ते अरवलीदरम्यान १४,४०० झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्या जागी आता २० हजार झाडांची लागवड करण्यात येणार असून त्याचा प्रारूप आराखडा मंगळवारी झालेल्या बैठकीत तयार करण्यात आला. चिपळूण वन विभाग आणि दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून ही लागवड रोपे उपलब्ध होणार आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आणि आजूबाजूच्या झाडांची कत्तल करण्यास सुरुवात झाली; परंतु काम झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन रोपे लावण्याचा करार संबंधित ठेकेदार कंपनी बरोबर शासनाने केलेला आहे. याचा विसर सर्वांनाच पडला होता. आमदार शेखर निकम यांनी महामार्ग कामाबाबत नुकत्याच घेतलेल्या बैठकीत माजी सभापती शौकत मुकादम यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा याबाबत कोणतीच हालचाल झाली नसल्याचे समोर आले होते. त्यावेळी मुकादम यांना बरोबर घेऊन तत्काळ वृक्षलागवडीचा आराखडा तयार करा, अशा सूचना आमदार निकम यांनी प्रशासनाला दिल्या होत्या.
त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महामार्ग विभागाचे रॉजर मराठे, वनविभागाचे सचिन निळख, तसेच संबंधित वनाधिकारी, कृषी अधिकारी व ठेकेदार कंपनीचे शिव प्रसाद तसेच शौकत मुकादम, कलंबस्ते विकास गमरे, आदी उपस्थित होते.
यावेळी चिपळूण परशुराम ते आरवली या ३६ किलाेमीटर महामार्ग रस्त्यावर वृक्षलागवडीबाबत चर्चा करण्यात आली. २० हजार वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पिंपळ, वड, जांभूळ असे ऑक्सिजन देणारे वृक्ष जास्तीत जास्त प्रमाणात लावण्यात यावेत, अशी मागणीदेखील मुकादम यांनी बैठकीत केली. त्यानुसार १२ हजार रोपे चिपळूण वनविभाग तयार करून देणार असून, त्यासाठी वनविभागाला तत्काळ प्रस्तावदेखील देण्यात आला. आठ हजार रोपे ही दापोली कृषी विद्यापीठाकडून घेण्यात येणार आहेत. मार्च २०२२ पासून या वृक्षलागवडीला सुरुवात होणार असून रोपांची नासधूस होऊ नये म्हणून लोखंडी जाळ्यांचे कुंपणही लावले जाणार आहे. पुढील १५ वर्षे संबंधित ठेकेदार कंपनीने या रोपांची देखभाल करावयाची आहे.
फोटो -
महामार्ग दुतर्फा वृक्षलागवडीबाबत बैठकीत चर्चा करताना शौकत मुकादम आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.