रत्नागिरी : वर्षभर ज्याच्या आगमनाची आतुरता लागून राहते त्या गणपती बाप्पांची भाद्रपद चतुर्थीला प्रतिष्ठापना सर्वत्र करण्यात आली होती. दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, नऊ दिवस, दहा दिवसाचा उत्सव साजरा करून बहुतांश गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी मानाचे व नवसाचे २१ दिवसांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. जिल्ह्यातील ३०८ घरगुती व २ सार्वजनिक गणेशमूर्तींचे ठिकठिकाणी विसर्जन करण्यात आले.भाद्रपद चतुर्थीला एक लाख ६५ हजार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सलग दोन वर्ष कोरोना निर्बंध असल्याने उत्सव शांततेत साजरा करण्यात आला. मात्र यावर्षी निर्बंधमुक्त करण्यात आल्याने उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवात श्री सत्यनारायण महापूजा, सहस्त्रनाम, अथर्वशीर्ष, भजन, आरती आदि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी मुंबईकरही मोठ्या संख्येने उत्सवासाठी गावी आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जाखडीनृत्य, टिपरीनृत्य आदि कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती.काही भाविकांकडून २१ दिवस नवसाचे किंवा मानाचे गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणरायांची मनोभावे सेवा करून गणपतीबाप्पांना निरोप देण्यात आला. ढोलताशा पथक, बेंजोच्या तालावर गणेशमूर्तींची सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. विसर्जन घाटावर निरोपाची आरती झालेनंतर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ साकडे घालून भाविक जड अंतकरणाने माघारी फिरले.रत्नागिरी शहर पोलिस स्थानक हद्दीत ४ घरगुती व एक सार्वजनिक, ग्रामीण मध्ये १३ घरगुती, जयगड २९, संगमेश्वर १५०, राजापूर ७६, नाटे १३, देवरूख येथे एक सार्वजनिक, गुहागर येथे दहा घरगुती, दापोली १ घरगुती, पुर्णगड ९ व दाभोळचे ३ मिळून एकूण ३०८ घरगुती व दोन सार्वजनिक गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला.
रत्नागिरीत २१ दिवसांच्या गणपती बाप्पांना साश्रूनयनाने निरोप
By मेहरून नाकाडे | Published: September 20, 2022 6:42 PM