मेहरुन नाकाडे
रत्नागिरी : सेंद्रिय उत्पादनांना असलेली वाढती मागणी लक्षात घेता, संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवण येथील २१ शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. गेली चार वर्षे संजीवन सेंद्रिय शेती गटातर्फे बारमाही शेतीतून विविध उत्पादने घेत उत्पन्न मिळवत आहेत. सामूहिक प्रयत्नातून ५० एकर क्षेत्र सेंद्रिय लागवडीखाली आणले आहे.
खरिपात भात लागवड, रब्बीमध्ये भाजीपाला, कुळीथ, वाल, भुईमूग, पावटा, कलिंगड लागवड करीत आहेत. वेळोवेळी आलटून पालटून पिके घेण्यात येत आहेत. गांडूळ खताच्या वापरामुळे जमीन सुपीक व कसदार बनली असून उत्पादनही चांगले मिळत आहे. गतवर्षी १२० टन कलिंगडाचे उत्पन्न या गटाने घेतले होते. लाॅकडाऊनचा फटका काहीअंशी बसला. मात्र न डगमगता शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर विक्री केली. भविष्यात फळप्रक्रिया व दुग्ध प्रक्रिया उद्योग उभारण्याचा गटाचा मानस आहे. गटाचे अध्यक्ष प्रभाकर मांगले व सर्व सहभागी परिश्रम घेत असले तरी, त्यांना कृषी विभाग, आत्मा विभाग, तसेच कृषी अधिकारी मृणालिनी यादव यांचे सहकार्य लाभत आहे. गवा रेड्याचा उपद्रव होत असला तरी शेतकरी सतत शेतावर पहारा देत आहेत.
गांडूळ खत निर्मिती
गटातर्फे गांडूळ खत निर्मिती केली जात आहे. दरवर्षी २० टन खत निर्मिती करून गटासाठी ठेवून उर्वरित दहा ते बारा टन खत विक्री करीत आहेत. त्यामुळे खत विक्रीतून गटासाठी उत्पन्न प्राप्त होत आहे. भविष्यात गांडूळ खत निर्मिती वाढविण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष मांगले यांनी सांगितले.
अवजार बँक
यांत्रिक अवजारांमुळे वेळ, खर्च वाचतो. त्यामुळे गटाने शासकीय अनुदानावर अवजारे गटासाठी संकलित केली असून, अवजार बँकच जणू तयार केली आहे. गटाच्या शेतीसाठी अवजारांचा वापर करीत असतानाच शेतकरी, गटाचे सदस्य यांना नाममात्र भाड्याने अवजारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा अनावश्यक वेळ वाचत आहे. शिवाय कामही वेळेवर पूर्ण केले जात आहे.
भात, भाजीपाला, कलिंगड, आंबा, काजूचे उत्पादन गटातर्फे घेण्यात येत आहे. सेंद्रिय उत्पादनाला विशेष मागणी असून हातोहात विक्री होत आहे. विक्रीसाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. भविष्यात शेती वाढविण्यावर गटाचा भर राहणार आहे.
गतवर्षी कृषी विभागाने भुईमूग बियाणे उपलब्ध करून दिले होते. कोकणच्या लाल मातीत भुईमुगाचे चांगले पीक येत असल्याचे गटाने सिध्द केले आहे. सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण झाले असून, गटाकडे प्रमाणपत्रही प्राप्त असून उत्पादन विक्रीमध्ये सुलभता आली आहे.
सेंद्रिय पध्दतीने उत्पादित आंबा, काजूलाही विशेष मागणी आहे. आंबा कच्चा व पिकलेला दोन्ही प्रकारचा विकण्यात येतो. ग्राहक स्वत:हून गटाकडे संपर्क साधून खरेदी करीत आहेत. कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेत असून, विक्रीही स्वत:च केली जात आहे.