रत्नागिरी : अमली पदार्थाची खरेदी - विक्री विराेधात पाेलिसांनी धडक माेहीम सुरू केली आहे. गेल्या दाेन दिवसात कारवाई केल्यानंतर पाेलिसांनी शनिवारी (१३ मे) मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्यान अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आणखी तिघांना पकडले आहे. त्यांच्याकडून २१.७८ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
संदीप गोविंद शिवगण (रा. धनजीनाका रत्नागिरी), आकीब खालीद काझी (रा. गवळीवाडा रत्नागिरी), तौसिफ आसिफ मिरजकर (रा. राहुल कॉलनी गवळीवाडा, रत्नागिरी) अशी तिघांची नावे आहेत. शनिवारी मध्यरात्री रत्नागिरी शहर पोलिस स्थानक गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व पोलिस अंमलदार हे रत्नागिरी रेल्वे स्थानक येथील पार्सल गेटमधून पार्किंगकडे जाणाऱ्या मार्गावर पायी पेट्रोलिंग करीत हाेते. पोलिस स्थानक गुन्हे अभिलेखावरील असलेले, माहितगार गुन्हेगार संदीप गोविंद शिवगण, आकीब खालीद काझी, तौसिफ आसिफ मिरजकर हे तिघे एकत्रित त्याठिकाणी संशयास्पद हालचाल करताना दिसले. त्यांना जागीच थांबवून त्यांची अंग झडती घेण्यात आली.
या अंगझडतीत २१.७८ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन हा अंमली सदृश पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याच्या स्थितीत सापडला. या तिघांनाही ताब्यात घेऊन एन. डी. पी. एस. ॲक्ट कलम ८ (क), २२ (ब), व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई, रत्नागिरी शहर पोलिस स्थानिक, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पाेलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, पाेलिस हेडकाॅन्स्टेबल प्रसाद घोसाळे, गणेश सावंत, प्रवीण बर्गे, अमोल भोसले, पाेलिस नाईक आशिष भालेकर, विनय मनवल, रत्नकांत शिंदे, पंकज पडेलकर यांनी केली.