- शिवाजी गोरे
दापोली - पालगड: रत्नागिरी जिल्ह्यातील शिवकालीन पालगड किल्ल्यावर शिवजयंतीच्या पुर्व संध्येला तयारीच्या कामासाठी गेलेल्या तरूणांना 22 तोफगोळे सापडले. झोलाई स्पोर्ट्स पालगड दरवर्षी पालगड किल्ल्यावर शिवजयंती साजरी करतात. याही वर्षी शिवजयंती साजरी करण्यात आली .
दापोली तालुक्यातील पालगड आणि खेड तालुक्यातील घेरा पालगड या दोन गावाच्या मध्यभागी असलेल्या शिवकालीन पालगड किल्ल्यावर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला तयारीच्या कामासाठी गेलेल्या तरूणांना एकूण 22 तोफगोळे सापडले आहेत. उत्साही तरूणांनी या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवण्यासाठी एका ठिकाणी खोदकाम केले. सुरुवातीला त्यांना एक गोळा सापडला. मात्र आणखी खोदकाम केले असता त्यांना एकूण 22 तोफगोळे सापडल्याने ते पाहण्यासाठी ग्रामस्थांसह इतरांनी याठिकाणी गर्दी केली होती. मंडळाकडून या तोफ गोळ्यांची पूजा करण्यात आलीदापोली तालुक्यातील पालगड किल्ला दुर्लक्षित किल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु अलीकडेच या ठिकाणी दर वर्षी शिवजयंती साजरी करण्यासाठी काही तरुण मंडळी या किल्ल्यावर जात आहेत. सालाबादप्रमाणे या वर्षीदेखील शिवप्रेमी किल्ल्यावर दाखल झाले व त्यांनी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली. परंतु यावर्षी या किल्ल्यावर शिवकालीन तोफगोळे सापडून आल्याने इतिहास प्रेमी चांगलेच सुखावले आहेत.