रत्नागिरी : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्याला मोठा फटका बसला असून, जिल्हा परिषदेचे १८१ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. अंतिम अहवाल तयार झाला असून, तात्पुरत्या दुरुस्तीसाठी २२ काेटी २२ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे.
२१ व २२ जुलैला पडलेल्या अति मुसळधार पावसाने माेठ्या नद्यांना पूर आला. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांमध्ये भुस्खलन झाले. गावांचा संपर्क तुटला, रस्ते खचले, पूल वाहून गेले. चिपळूण, खेड शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर झाली होती. जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा अंतिम अहवाल नुकसान जिल्हा परिषद प्रशासनाने तयार केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान चिपळूण बांधकाम विभागाचे १११ कोटी २६ लाख रुपये आहे. रत्नागिरी विभागाचे ६९ कोटी ९० लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यात ८५८ रस्त्यांचे १३५ कोटी रुपयांचे, १०५ साकवांचे २१ काेटी ९२ लाख रुपये, १४ इमारतींचे १ कोटी ३८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अजूनही अनेक गावांतील रस्ते खचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहेत. तात्पुरत्या दुरुस्तीसाठी २२ कोटी २२ लाख रुपयांची गरज असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडून प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजनसह आपत्कालीन निधीतून मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने यांच्यासह बाधित गावातील सदस्यांनी आढावा घेऊन घटनास्थळांची प्रत्यक्ष पाहणीही केली होती.