रत्नागिरी : आषाढ महिना सुरू होताच गणेशोत्सवाचे वेध लागतात. गतवर्षीपासून कोरोनाचे वातावरण असल्याने भाविकांच्या उत्साहाला ग्रहण लागले आहे. मात्र, सध्या रुग्णसंख्या घटत असल्याने निर्बंधही कमी होत आहेत. यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले असले तरी कोरोनाने आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी गावी येणाऱ्यांची संख्या वाढेल, असे अपेक्षित आहे. त्यासाठी कोकणात २,२०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला आहे.
परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी मुंबई येथे ही माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकांतून दि. ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून, चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. दि. १६ जुलै २०२१पासून त्यासाठीच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत.
दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एस. टी. धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे २,२०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यांवर धावतील, असे परब यांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी दि. ४ ते १० सप्टेंबर दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील, तर १४ ते २० सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. या बसेससाठी १६ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार असून, चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचेही एकाचवेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून, सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान एस. टी.ची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एस. टी.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मार्गावर तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत, असेही परब यांनी सांगितले.
................................
कोकण रेल्वे फुल्ल
कोकण रेल्वेने आपल्या जादा गाड्यांची घोषणा आधीच केली आहे. तीन महिने आधी त्याचे आरक्षण सुरु होत असल्याने ते पूर्णही झाले आहे. आता एस. टी. महामंडळाने जादा गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांसाठी मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे.