कणकवली: प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत आरोग्य विषयक योजना गावागावात पोहचविण्यासाठी डाटा ऑपरेटर व तालुका समन्वयकाची नोकरी देण्यात येईल. असे आमिष दाखवून त्याच्या प्रशिक्षणासाठी कोल्हापूर जिल्हयातील दोघांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील २२५ हून अधिक युवक, युवतींकडून प्रत्येकी ५ हजार रुपये उकळून लाखो रुपयांचा गंडा घातला.कणकवलीतील नगरवाचनालयाच्या सभागृहामध्ये बुधवारी आणि गुरुवारी हे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी जिल्हयाभरातील युवक आणि युवती आले होते. केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत आरोग्यविषयक माहिती गावागावत जावून पोहचवावी आणि आवश्यक डाटा गोळा करावा यासाठी डाटा ऑपरेटर तसेच तालुका स्तरावर समन्वयक अशी नोकरी दिली जाणार आहे. डाटा ऑपरेटरला १५ हजार तर समन्वयकाला २१ हजार रुपये पगार दिला जाईल. त्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागेल असे सांगत त्या मुलांकडून प्रत्येकी ५ हजार प्रमाणे पैसे घेण्यात आले.हा प्रकार संशयास्पद असल्याचे समजताच कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी प्रशिक्षणस्थळी जाऊन संबंधित कथित अधिकाऱ्यांच्याकडे अधिकृत लेखी आदेश आहेत का? अशी विचारणा केली. मात्र त्यांच्याकडे तसे कोणतेही अधिकृत पत्र आढळले नाही. त्यामुळे हा फसवणूकीचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असून पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली जाईल असे सांगत त्या दोन कथित अधिकार्यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. याच दोन कथित अधिकार्यांनी रत्नागिरीमध्येही १७० महिलांकडून अशाच प्रकारे पैसे घेतल्याचे उघड झाले आहे.हा प्रकार समजताच पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, महिला उपनिरीक्षक बरगे, हवालदार बावधाणे हेही त्याठिकाणी पोहचले. मुलांनी आपले पैसे परत देण्याची मागणी केली. नगराध्यक्षांनीही मुलांची फसवणूक झाल्यास खपवून घेणार नाही असा इशारा देताच त्या कथित अधिकार्यांनी ७५ मुलांचे प्रशिक्षणासाठी घेतलेले पैसे दोन दिवसात मागे देण्याचे मान्य केले. त्यानंतर पोलिस अधिकार्यांनी त्या दोन कथित अधिकार्यांना पोलिस स्टेशनला नेवून त्यांची चौकशी सुरु केली. त्यांची सखोल चौकशी करुन यामध्ये ते दोषी आढल्यास पुढील कारवाई केली असे पोलिसांनी सांगितले. यावेळी नगरसेवक अण्णा कोदे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.खेडमध्ये १६२ जणींची फसवणूकखेड तालुक्यातही अशाच प्रकारे जवळपास दीडशेहून अधिक महिलांकडून पैसे उकळण्यात आले, याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे.कोल्हापूर येथील एका व्यक्तीने आपण महाराष्ट्र ई-गव्हर्नन्स प्रोजेक्टचा प्रमुख असल्याचे सांगत ग्रामपंचायतीमध्ये पंधरा हजार रुपये वेतन मिळवून देणारी डाटा ऑपरेटरची नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी संबंधित महिलांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये एका संस्थेच्या नावे उकळले.एका वृत्तपत्रात या नोकरीबाबत जाहिरात देऊन यासाठी संपर्क केलेल्या महिलांना मार्च महिन्यात डेटा ऑपरेटरच्या नोकरीसाठी पात्रता प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. मात्र बेरोजगार महिलांनी असमर्थता दर्शविल्याने त्यांच्याकडून तीन हजार रुपये घेण्यात आले. या महिलांनी ही रक्कम संबंधित संस्थेला ऑनलाइन भरल्यावर त्यांना संबंधित संस्थेच्या लेटरहेडवर सही व शिक्का असलेले कोरे प्रमाणपत्र पाठवून दिले होते.एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला नोकरी दिली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र यानंतर तीन महिने झाले पत्र दिले नाही. जिल्ह्यातील सुमारे १६२ बेरोजगार महिलांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेऊन नोकरी न देता फसवणूक केल्याचा उघडकीस आला आहे. याबाबत शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे.या महिलांनी मार्च महिन्यात ऑनलाइन पैसे देऊनही प्रत्येक वेळी पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात नोकरीसाठी नियुक्तिपत्र दिले जाईल, असे आश्वासन देण्यात येत होते. याविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देतानाचा जुना फोटो पाठवून त्यामध्ये आपल्या संस्थेला जिल्हाधिकारी यांनी वर्कऑर्डर दिल्याचे संबंधित व्यक्तीकडून भासवले जात होते. याची माहितीही पोलिसांना दिली जाणार आहे.
नोकरीचे आमिष; रत्नागिरी, सिंधुदुर्गात २२५ जणांना गंडा; संशयित कोल्हापूरचे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 4:55 PM