रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत रविवारी केवळ २३.२२ टक्केमतदान झाले. मतदारांनी दाखविलेल्या निरुत्साहामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज, सोमवारी या निवडणुकीची मतमोजणी सकाळी ९ वाजता साळवी स्टॉप येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात होणार आहे. सकाळपासूनच जिल्ह्यातील ९ मतदान केंद्रांत शांततेत मतदानास सुरुवात झाली. १८ पैकी ११ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत १२ हजार ७३२ मतदारांपैकी केवळ ३ हजार १५७ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला, तर १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. त्यांनी सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे उमेदवारही जाहीर केले होते. मात्र, कॉँग्रेसमधील गटबाजीमुळे तीन उमेदवारांनी बंडखोरी केली. त्यामुळेच ही निवडणूक लादली गेल्याचे सहकार क्षेत्रातही बोलले जात आहे. १८ जागांपैकी ७ जागांवर सहकार पॅनेलचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. आता आज सोमवारी होणाऱ्या मतमोजणीत रिंगणातील १६ जणांचे भवितव्य निश्चित होणार आहे. सोसायटी मतदारसंघात १७२३, व्यापारी अडत मतदारसंघात ३६१, ग्रामपंचायत मतदारसंघात ८८६, तर कृषी प्रक्रिया मतदारसंघात १८७ मतदान झाले. मतदानाची ही आकडेवारी खूपच कमी आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांनी निरुत्साह दाखविल्याने कमी मतदानाचा फायदा कोणाला होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. आर. धुळप हे काम पाहत आहेत. या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या सहकार पॅनेलच्या उमेदवारांमध्ये गजानन पाटील, सुरेश कांबळे, विठाबाई कदम, आशालता सावंतदेसाई, प्रकाश जाधव, संजय नवाथे व मेघा कदम यांचा समावेश आहे. तर निवडणूक रिंगणात असलेले व सोमवारी मतमोजणीनंतर भवितव्य निश्चित होणाऱ्या उमेदवारांमध्ये संजय आंब्रे, अरविंद आंब्रे, राजेश गुरव, अनिल जोशी, दत्तात्रय ढवळे, मधुकर दळवी, शौकत माखजनकर, माधव सप्रे, महेंद्र कदम, निकिता पवार व हेमचंद्र माने यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरी बाजार समितीसाठी २३ टक्के मतदान
By admin | Published: April 17, 2016 11:21 PM