रत्नागिरी : कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, त्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव ग्रामीण भागावर झाला आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षमीकरणासाठी २५ कोटी रुपयांचा आराखडा जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती उदय बने यांनी दिली.
कोविडसाठी ठेवलेल्या ३० टक्के निधीतून आरोग्य केंद्रांना प्रत्येकी पाच बेड्स, नवीन ४५ रुग्णवाहिका तसेच विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही बने यांनी सांगितले. बने यांनी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जिल्हा दौऱ्याचे नियोजन करून ग्रामीण भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील लोकांना आवश्यक त्या सुविधांची माहिती घेऊन त्यानुसार आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणाची गरज असलेल्या साहित्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचे रुग्ण वाडी-वस्तींवर आढळत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनाबाधितांना उपचार मिळाले तर बरे होण्याचा दर वाढेल. जिल्हा परिषदेचा स्वत:चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. याबाबत पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासह सर्व आमदारांच्या मार्गदर्शनानुसार हा आराखडा आरोग्य विभाग तयार करणार आहे, असे बने यांनी सांगितले.
२० वर्षांपूर्वी जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या. त्या फार जुन्या झाल्या असल्याने अनेकदा सतत नादुरुस्त होत असल्याने त्याचा परिणाम गावागावात आरोग्य पथके तसेच रुग्णांना पोहोचविणे अशक्य होते, अशी बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे ४५ रुग्णवाहिकांची अवस्था बिकट असल्याने त्या नवीन घेण्याचा प्रस्ताव देण्यात येणार आहे, असेही बने यांनी सांगितले.