रत्नागिरी : येथील भारतीय तटरक्षक दलातर्फे रविवारी (१ ऑक्टाेबर) भगवती बंदर, रत्नदुर्ग परिसर व मांडवी समुद्रकिनारी येथे ‘स्वच्छता हीच सेवा’ ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमांतर्गत स्वच्छता माेहीम हाती घेतली हाेती. या माेहिमेंतर्गत २५० किलो कचरा गाेळा करण्यात आला आहे. हा कचरा नगर परिषदेच्या कचरा गाड्यांमध्ये टाकण्यात आला.स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे स्टेशन कमांडर उपमहानिरीक्षक शत्रुजीत सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित स्वयंसेवकांनी स्वच्छतेची प्रतिज्ञाही घेतली. या कार्यक्रमात शिरगाव (ता. रत्नागिरी) मत्स्य व्यवसाय महाविद्यालयाचे असोसिएटेड डीन डॉ. सुरेश नाईक, सीमाशुल्क विभागाचे सहायक आयुक्त राजकुमार कोळीपाका, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी रत्नागिरीचे एचआर व्यवस्थापक क्रांती कुमार लांका आणि सागरी सीमा मंचचे कोकण क्षेत्र समन्वयक संतोष पावरी, मिरकरवाड्यातील विविध स्थानिक मच्छिमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी व मच्छीमार सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे नियोजन भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या सहायक समादेशक फेरा टीपी यांनी केले.
मोहिमेदरम्यान, किल्ले गावातील भगवती बंदराजवळील जेट्टी परिसरात कचरा गाेळा करण्यात आला. हा कचरा पिशव्यांमध्ये स्वतंत्रपणे उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे वैद्यकीय अधिकारी सर्जन लेफ्टनंट गोपन जीजे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमोपचार पथक उपस्थित होते.
रत्नागिरीतील भारतीय तटरक्षक वायु अवस्थान यांनीही नवनिर्माण स्कूल, सर्वंकष स्कूल, पोदार स्कूल, गद्रे मत्स्य व्यवसाय समूह यांच्या सहकार्याने समादेशक विकास त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता माेहीम राबवली. या माेहिमेत सुमारे २५० स्वयंसेवक सहभागी झाले हाेते. या स्वयंसेवकांनी गणेश विसर्जन काळात मांडवी परिसरात १५० किलो कचरा गोळा केला.