रत्नागिरी : जिल्ह्यातील २५०० शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये १० टक्के शिक्षिकांची गैरसोय झाल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे़. त्याचबरोबर अनेक शिक्षिका नोकरीचा राजीनामा देण्याच्या तयारी असल्याचे समजते़ या बदल्या करताना शासनाने शिक्षक संघटनांसमोर नमते न घेतल्याने शिक्षक हरले, शासन जिंकले, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उमटत आहे़.चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या चार टप्प्यात बदल्या करण्यात आल्या होत्या़ त्यामध्ये ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक, अपंग, विधवा, परित्यक्ता, कुमारिका, गंभीर आजार असलेले, पती-पत्नी एकत्रिकरण, अवघड क्षेत्रात तीन वर्षांपेक्षा जास्त असलेले शिक्षक तसेच १० वर्षे एकाच क्षेत्रात असलेल्या शिक्षकांचा या बदल्यांमध्ये समावेश होता़ मात्र, मागणी करुनही शाळा न मिळालेल्या शिक्षकांच्या यात बदल्या करण्यात आल्या़. काही शिक्षक नेत्यांची डोंगराळ भागातील शाळांमध्ये बदली झाल्याने त्यांच्यासमोर संघटनांचे काम करताना अडचणीचे ठरणार आहे़, तर गेली अनेक वर्षे दुर्गम भागात काम करणाऱ्या शिक्षकांना या बदल्यांचा दिलासाही मिळालेला आहे़ पाचव्या टप्प्यातील बदल्या करताना शासनाने शिक्षक संघटनांसमोर नमते न घेता बदल्यांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रच हादरुन गेले आहे़.
सुगम-दुर्गम यादीमध्ये घातलेला घोळ जैसे थे ठेवून शासनाने बदल्या केल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे़ यामध्ये बदल्या झालेल्या शिक्षकांना बदल्या हव्या होत्या़ मात्र, कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही, याचा विचार करुनच शासनाने हा निर्णय घ्यावा, असेच म्हणणे शिक्षक संघटनांचे होते़ त्यासाठी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, ग्रामविकासमंत्री यांना शिक्षकांनी साकडे घातले होते़ शासन आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने शिक्षक बदल्या आचारसंहितेपूर्वीच करण्यात आल्या़. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या चालू शैक्षणिक वर्षात पाच टप्प्यात करण्यात आल्या़ या बदल्या करताना शासनाने सुगम-दुर्गमच्या यादीमध्ये शिक्षकांनी घेतलेल्या आक्षेपाप्रमाणे कोणतीही दुरुस्ती न करता जुन्या यादीप्रमाणेच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या़. शिक्षकांच्या मागणीप्रमाणे ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी लावलेली बैठकही रद्द करण्यात आली होती़ त्यामुळे बदल्या होणार हे निश्चित झाले होते़ त्याप्रमाणे आचारसंहिता लागण्यापूर्वी अचानकपणे ग्रामविकास विभागाने बदल्यांचा आदेश काढल्याने शिक्षण विभागाचीही धावपळ उडाली होती़. ज्या शिक्षकांना पाचव्या टप्प्यातील शाळा मिळालेल्या नाहीत, अशा शिक्षकांच्या रँडम राऊंडमध्ये बदल्या करण्यात आल्या. यामध्ये १० टक्के शिक्षिकांची गैरसोय झाली आहे़ त्याचबरोबर रत्नागिरी तालुक्यातील एका शिक्षकाची माचाळ या अतिदुर्गम भागातील शाळेमध्ये बदली झाली आहे़ शिक्षक नेते संतोष रावणंग, अजित कांबळे व अन्य शिक्षक नेत्यांची बदली झाली आहे़