रत्नागिरी : गेल्या दिवसभरात जिल्ह्यात नव्याने २५९ कोरोना रूग्णांची भर पडली असून सोमवारी १४ काेरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयात झाली आहे. रुग्णसंख्येत घट होऊ लागल्याने जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळू लागला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या २४ तासांच्या अहवालानुसार, जिल्ह्यात २५९ नवे रूग्ण नोंदविण्यात आले. यापैकी सोमवारी अँटिजन चाचणीत पाॅझिटिव्ह आलेले रूग्ण ७ तर आरटीपीसीआर चाचणीत २०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. या रुग्णांमध्ये सर्वाधिक ८५ रूग्ण रत्नागिरी तालुक्यातील असून दापोली ११, गुहागर २, चिपळूण ३०, संगमेश्वर २०, मंडणगड १४, लांजा ३६ आणि राजापूर तालुक्यातील ११ रुग्णांचा समावेश आहे. खेड तालुक्यात एकाही रुग्णाचा समावेश नाही. तसेच या आधीच्या ५० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३०,५९५ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने मृत्यू झालेल्या १४ रुग्णांची नोंद झाली असून त्यात आधीच्या ७ रुग्णांचा समावेश असून सोमवारी ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरी तालुक्यात ४ आणि गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर या तीन तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्याआधीच्या सात मृतांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील ५ आणि खेड, रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णसंख्या ३०,५९५ इतकी झाली असून ९२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी १७.१३ टक्के तर मृत्यूचा दर ३.०३ टक्के इतका आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक २६० मृत्यूची नोंद झाली असून त्याखालोखाल चिपळूण १८४ आणि संगमेश्वर तालुक्यात १३२ मृत्यूची नोंद झाली आहे.