मेहरून नाकाडे
रत्नागिरी : शासनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वीकेंड लाॅकडाऊन घोषित केला होता. अत्यावश्यक सेवा म्हणून एस.टी.ला लाॅकडाऊनमधून वगळण्यात आले होते. पण नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत, घराबाहेर पडणेच टाळले. त्यामुळे शनिवार, रविवार या दोन दिवसात प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी एस.टी.च्या सेवेवर परिणाम झाला.
गेल्या दोन दिवसात बहुतांश मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या. शिवाय दोन दिवसात जेमतेम २६१ फेऱ्या केल्या. प्रवासी भारमानही फारसे लाभले नसल्याने उत्पन्नात घट झाली. गतवर्षी लाॅकडाऊनमुळे एस.टी.च्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाला होता. हळूहळू उत्पन्नाची गाडी रुळावर येत असताना, पुन्हा रत्नागिरी विभागाला आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
- आगारातील एकूण बसेसची संख्या ६००
- दोन दिवसात धावलेल्या बसेस २६७
- फेऱ्या झाल्या आगारामध्ये ८८२
- पैसे मिळाले दोन दिवसात २४०६४३१
- दोन दिवसात ७५ लाखांचा तोटा
दैनंदिन ६०० गाड्यांद्वारे ४ हजार २०० फेऱ्यांद्वारे दोन ते सव्वादोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत असल्यामुळे ५० लाखांपर्यंत उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होत आहे.मात्र शनिवारी ६८१, तर रविवारी २०१ फेऱ्या संपूर्ण विभागात होऊ शकल्या. त्यामुळे शनिवारी ३७ हजार ६२०, तर रविवारी ४५२० प्रवाशांनी प्रवास केला. दोन दिवसात अवघ्या ४२१४० प्रवाशांनी प्रवास केला. दोन दिवसात २४ लाख ६४३१ रुपयांचे उत्पन्न लाभले आहे. मात्र दैनंदिन उत्पन्नाच्या तुलनेत ७५ लाख ९३ हजार ५६९ रुपयांचा तोटा विभागाला सोसावा लागत आहे.
निम्मेच कर्मचारी कामावर
शनिवारी ४०२ व रविवारी १३२, असे मिळून एकूण ५३४ चालक, वाहक कामावर होते. अन्य कर्मचाऱ्यांना मात्र सुटी देण्यात आली होती. वीकेंड लाॅकडाऊनमुळे प्रवाशांअभावी वाहतूक ठप्प झाली होती. कोरोना संसर्गाचा धोका असतानाही सेवेवर असणाऱ्या चालक, वाहकांनी सेवा बजावली. वाहकांचा तर प्रवाशांशी संपर्क येतच असल्याने खबरदारी घ्यावी लागते.
शासन आदेशाचे पालन करीत एस.टी.ची सेवा सुरू ठेवण्यात आली होती. मात्र प्रवासी भारमानाअभावी एस.टी.च्या सेवेवर परिणाम झाला आहे. सोमवारी मात्र बऱ्यापैकी प्रवासी प्रतिसाद लाभला.- सुनील भोकरे,विभाग नियंत्रक, रत्नागिरी