चिपळूण : एकीकडे महापुरामुळे महावितरणचे सुमारे २ कोटींचे नुकसान झालेले असताना दुसरीकडे वीज बिलापोटी चिपळूण व गुहागरमधून आतापर्यंत सुमारे २९ कोटी रुपये थकीत असल्याने हा विभाग काहीसा अडचणीत आला आहे. याआधी कधीही थकबाकी नसलेला चिपळूण व गुहागर तालुका आता थकबाकीच्या भोवऱ्यात अडकला आहे.
दरवर्षी महावितरणचे चिपळूण, गुहागर या दोन तालुक्यात सरासरी ४ कोटी रुपये थकीत असतात. मात्र, यावेळी कोरोनाच्या परिस्थितीमुळे वीज बिल वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती निर्माण झाल्याने आणखीनच फटका बसला आहे. या दोन तालुक्यातील एकूण ग्राहकांपैकी ५३,६१८ ग्राहक थकबाकीदार आहेत. अशी सुमारे १७ कोटी रुपयांची थकबाकी असून, मागील १२ कोटी रुपये थकबाकी आहे. असे एकूण २९ कोटी रुपये थकीत असून हे प्रमाण सरासरी थकबाकीच्या तीनपट आहे. त्यामुळे या वसुलीसाठी महावितरणला कंबर कसावी लागणार आहे. विशेष म्हणजे मागील थकीत १२ कोटी रुपयांपैकी व्यावसायिकांचे ३ कोटी ४२ लाख रुपये, तर घरगुती व दुकानदारांचे पावणे नऊ कोटी रुपये थकीत आहेत.
------------------------
वीज बिल दुप्पट
आधीच कोरोनाची परिस्थिती व महापुरामुळे नागरिक, व्यापारी हैराण झालेले असताना महावितरणने अगदी अडचणीच्या काळात ग्राहकांना सरासरी पद्धतीने अंदाजे वीज बिल आकारली आहेत. ही वीज बिल नेहमीच्या वीज बिलांच्या दुपटीने असल्याने ग्राहकांवर त्याचा भार वाढला आहे. याविषयी ग्राहकांमधून मोठी ओरड सुरू झाली असून अनेक जण महावितरणकडे वीज बिल घेऊन धाव घेत आहेत.
-----------------
पूर परिस्थितीमुळे यावेळची बिले मागील तीन महिन्याची सरासरी काढून कॉम्प्युटर काढली आहेत. त्यामुळे यावेळी काही प्रमाणात बिल वाढले असले, तरी पुढील महिन्यात नेहमीच्या पद्धतीने मीटरची रिडिंग घेतल्याने या बिलाच्या रकमेत फरक दिसून येईल. त्यामुळे ग्राहकांनी आताच्या बिलांविषयी गैरसमज करून न घेता आवश्यकता असल्यास कार्यालयातून बिल कमी करून घ्यावीत.
- कैलास लवेकर, कार्यकारी अभियंता, महावितरण, चिपळूण.