- आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : येथील ऐतिहासिक पवन तलाव मैदानाच्या सुशोभिकरणासाठी राज्य शासनाकडून २ कोटी २५ लाख रुपयांचा निधी तर गोवळकोट येथील क्रीडांगण विकसित करण्यासाठी १ कोटी १० लाख रुपयांचा असा एकूण ३ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर करून आणण्यात आमदार शेखर निकम यांना यश आले आहे.
राज्य शासनाकडून येथील नगर परिषदेच्या या दोन क्रीडांगणांच्या विकासासाठी ३ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याचे पत्र राज्याचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी दिले आहे. आमदार निकम यांनी यापूर्वी चिपळूण नगर परिषद व देवरूख नगर पंचायतीसाठी १० कोटींचा निधी मंजूर करुन आणला होता. काही दिवसांपूर्वी पवन तलाव विकसित व्हावे व गोवळकोट येथील क्रीडांगण सुसज्ज व्हावे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, राज्यातील नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान दिले जाते. त्यातून ३ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
कोरोना संकटात आमदार निकम यांनी नागरिकांना दिलासा दिला. त्यानंतर ते चिपळुणात आलेल्या महापुरातही अगदी पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत रात्रंदिवस मदतकार्यात गुंतले आहेत. त्याचबरोबर विकासकामांकडेही त्यांचे विशेष लक्ष आहे.