रत्नागिरी : शिक्षकांनी बदल्यांसाठी मंत्रालयातून शासकीय अध्यादेश काढून आणला. त्यातील एका वाक्याचा आधार घेत बदल्या थांबवण्यात आल्या होत्या. मात्र शिक्षकांनी मंत्रालयातून हा अध्यादेश बदलून आणला. या बदल्यांमध्ये ३० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे शिवसेनेचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. त्याचवेळी त्यांनी शिक्षक बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप केला. ज्यावेळी आपला मुलगा विक्रांत जाधव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, तेव्हा शिक्षकांनी मंत्रालयातून एक शासकीय अध्यादेश आणला. बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे, असा हा आदेश होता. मात्र त्यात शेवटी एक वाक्य होते की पर्यायी व्यवस्था झाल्याखेरीज या शिक्षकांना सोडू नये. त्यामुळे त्यावेळी बदली झालेल्या शिक्षकांना सोडण्यात आले नाही.त्यानंतर या शिक्षकांनी मंत्रालयात जाऊन शासकीय अध्यादेश बदलून आणला. त्यात हे वाक्य नव्हते. त्यामुळे या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यात ३० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, अशी चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे, असे ते म्हणाले.
महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून आपल्याला काहीही निधी मिळालेला नाही. आता ती अपेक्षाही नाही. मात्र उद्धव ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या कामांना या सरकारने स्थगिती दिली आहे. ज्या कामांना प्रशासकीय, वित्तीय मंजुरी आहे, अशी कामे थांबवता येत नाहीत. मात्र हे सरकार कायदा, नियम पायदळीच तुडवत आहे, असा आरोपही त्यांनी केला.सामंत यांचे नाव न घेता टीकाजिल्ह्यातील प्रशासनावर वचक राहिलेला नाही. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला काही महत्त्वाच्या खात्यांचे अधिकारी उपस्थित नव्हते. याआधी अधिकारी सभेला गैरहजर राहायला घाबरायचे. मात्र आता कोणाला फरक पडत नाही, अशी स्थिती असल्याची टीका आमदार जाधव यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे नाव न घेता केली.सामंत यांचे कौतुकही
महिला बचत गटांच्या बैठकीसाठी वर्षातून एकदा निधी देणे, त्यांना उत्पादनासाठी जागा देणे, त्यांच्या तयारी मालाच्या विक्रीसाठी जागा देणे, त्यांना मोबाईल देणे या आपण गतबैठकीत केलेल्या मागण्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यानुसार तरतूदही झाली. त्यामुळे आपण सामंत यांचे कौतुक केले असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.