रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेड भागाला पुराचा मोठा फटका बसलेला असतानाच रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई परवा रात्री बाजारपेठेत आलेलं पाणी कालपर्यंत कायम होते. त्यानंतर काल रात्रीपासून पाण्याची पातळी पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली.
संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली आणि पाणी लोकवस्तीत शिरले. मुसळधार पावसामुळे रात्री १ वाजता पाणी लोकवस्तीत शिरू लागले. पाण्याचा वेग वाढला होता. त्यामुळे लोकांना तसेच वयोवृध्दांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. अनेकांच्या घरातील फ्रीज वॉशिंग मशीन भांडी आदी सामानदेखील हलवावे लागले आहे. सध्या गणपतीचा सण जवळ आल्याने गणपती कारखान्यात मूर्तीचे काम सुरू होते, त्या कारखान्यांतील गणेश मूर्तीदेखील हलविण्यात आल्या. ग्रामस्थांनी या कामी पुढाकार घेतला चांदेराई भागातील पंधरा घरे पुरात बाधित झाली आहेत.
चांदेराई प्रमाणेच हरचिरी गावातही पाणी घुसल्याने ३० घरे पुरात बाधित झाली आहेत. दरवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती उद्भवत असते. नदीतील गाळ उपसा व अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी असल्याचे माजी सरपंच दादा दळी यांनी सांगितले. मात्र प्रशासनाने त्याकडे फारसे गांभीर्याने न घेतल्याने ही परिस्थिती वारंवार उद्भवत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासन यावर कायमची उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.