रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथे अचानक एलपीजी वायूची गळती झाल्याने माध्यमिक विद्यामंदिरातील ६९ विद्यार्थिनींना बाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत जयगड येथून सुमारे ६० विद्यार्थिनींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असून, शुक्रवारी त्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती.गुरुवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास जयगड परिसरात अचानक वायू पसरला . येथील माध्यमिक विद्यामंदिरातील शिक्षक तसेच मुख्याध्यापक प्रदीप वाघोदे यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तत्काळ जवळच्याच कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हात वर करून आमच्या कंपनीमध्ये अशी दुर्गंधी येत असलेला कोणताही गॅस अथवा वायू नसल्याचे सांगितले. त्यानंतर वाघोदे यांनी आपत्ती व्यवस्थापन तसेच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
त्यावेळी काही विद्यार्थ्यांना त्रास जाणवत होता. आठ विद्यार्थ्यांना पाेटात मळमळ होऊन उलटीचा त्रास सुरू झाला. शिक्षणाधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे मुख्याध्यापक वाघोदे यांनी त्या मुलांना काही वेळातच तेथील रुग्णालयात नेले. हळूहळू ही संख्या वाढत जाऊन ती ६० पर्यंत गेली. विद्यार्थ्यांवर उपचार करून काहींना घरी सोडण्यात आले. मात्र, दीड ते दोन तासांच्या अंतराने त्या विद्यार्थ्यांना पुन्हा अस्वस्थता वाटू लागली. त्यामुळे जयगड परिसरात खळबळ उडाली . रुग्णालयासमोर परिसरातील हजारो लोकांचा जमाव जमला . दरम्यान, विद्यार्थ्यांची तब्येत अधिकच बिघडू लागल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यात विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे.जयगड परिसर आणि रत्नागिरीतील सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. मिळेल त्या वाहनाने अत्यवस्थ विद्यार्थिनींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते येत असलेल्या वाहनातून विद्यार्थिनींना उचलून नेत होते. काहींना स्ट्रेचरवर तर काहींना खुर्चीमध्ये बसवून हलवत होते. त्यामध्ये पोलिस तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. एका विद्यार्थिनीला मासळीच्या चारचाकी टेम्पोतून उपचारासाठी आणले गेले.या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर लगेचच उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईणकर आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयात आले. विद्यार्थी रुग्णालयात येण्याआधीच मोठा फौजफाटा मदतीसाठी व बंदोबस्तासाठी तैनात होता. दोन विद्यार्थिनींना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयात मोठी गर्दीरुग्णांचे शेकडो नातेवाईक जिल्हा शासकीय रुग्णालयात जमा झाले होते. त्यांना पोलिस शांतता राखण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करत होते. त्याला नातेवाइकांकडून प्रतिसादही देण्यात येत होता. मात्र, जिंदल कंपनी बंद करा, अशा घोषणाही रुग्णांचे नातेवाईक देत होते.
जिंदल कंपनीचा नकारजयगड परिसरातील वायू गळतीबाबत आपला काहीही संबंध नसल्याचे प्रसिद्धी पत्रक जिंदल कंपनीने प्रसिद्धीस दिले आहे. त्यामुळे जयगड परिसरात ही वायू गळती कुठून झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज घरी पाठवणारमहसूल प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेतली. उपविभागीय अधिकारी जीवन देसाई आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे बराच काळ रुग्णालयातच होते. दरम्यान दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना शुक्रवारी घरी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.