रत्नागिरी : गणेशोत्सवात गावी येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, एसटी महामंडळाने यंदा कोकणात ३,१०० जादा गाड्या पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १६ सप्टेंबरपासून या जादा गाड्या मार्गस्थ होतील. यातील दोन हजार गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात येणे अपेक्षित आहे. उर्वरित गाड्या रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील.दरवर्षी गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे मुंबई व उपनगरातून जादा गाड्या सोडण्यात येतात. गणेश चतुर्थी दि. १९ सप्टेंबर रोजी आहे. तत्पूर्वी दोन ते तीन दिवस आधी सुरू होणाऱ्या जादा गाड्या १९ सप्टेंबरपर्यंत सुरू असतील. रत्नागिरी जिल्ह्यात दोन हजारांपेक्षा अधिक गाड्या अपेक्षित आहेत. उर्वरित १,१०० गाड्या रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.गणेशोत्सवासाठी जादा गाड्या येणार असल्याने, रत्नागिरी विभागातर्फे दुरुस्तिपथके, गस्तीपथके, क्रेनची उपलब्धता केली जाणार आहे. कशेडी ते चिपळूण, संगमेश्वर ते हातखंबा व हातखंबा ते राजापूर मार्गावर तीन गस्तीपथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. खेड, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा या चार ठिकाणी दुरुस्तीपथके उपलब्ध केली जाणार आहेत, शिवाय चिपळूण येथे क्रेन ठेवण्यात येणार आहे. विभागात तीन अद्ययावत ब्रेकडाऊन व्हॅन असून, त्या महामार्गावर भरणेनाका (खेड), चिपळूण, हातखंबा तिठा (रत्नागिरी) येथे तैनात ठेवल्या जाणार आहेत.परतीसाठी गौरी-गणपती विसर्जनापासून (दि. २३ सप्टेंबर) जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. १,९४८ जादा गाड्या सोडण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाइन आरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे.
गणेशभक्तांच्या स्वागतासाठी रत्नागिरी विभाग सज्ज ठेवण्यात येणार आहे. मंडणगड ते राजापूर आगारात जादा गाड्या दाखल होणार असून, प्रत्येक आगाराला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, शिवाय गणेशभक्तांसाठी एसटीकडून परतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठीचे ऑनलाइन आरक्षणही उपलब्ध करण्यात आले आहे. - प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी.