मेहरून नाकाडेरत्नागिरी : जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, खरीप हंगामात प्राधान्याने भातशेती केली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी भात बियाण्यांची खरेदी सुरू केली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्यारत्नागिरीतील शिरगाव संशोधन केंद्रातर्फे भाताची विविध वाण विकसित केली आहेत. या वाणांमधील ‘रत्नागिरी -८’ या वाणाला सर्वाधिक पसंती मिळत आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील केंद्रातून आतापर्यंत ३२ टन ‘रत्नागिरी - ८’ वाणाच्या बियाण्याची विक्री झाली आहे.शिरगाव येथील संशोधन केंद्रातर्फे विकसित केलेली भाताचे, भुईमुगाचे वाणाची बियाणी विक्रीसाठी ठेवलेली आहेत. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भात बियाण्यांसाठी मागणी वाढत आहे. परराज्यातूनही बियाणांसाठी संशोधन केंद्राकडे मागणी होत आहे. अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या सुधारीत जातीच्या वाणांसाठी विशेष मागणी होत आहे. रत्नागिरी ६, ७, ८ सह कर्जत ६, ७, ८ या प्रकारची बियाणी सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
रत्नागिरी आठ हे वाण १३५ दिवसांत तयार होत आहे. चवीसाठी तांदूळ उत्तम असल्याने या बियाण्याला शेतकऱ्यांकडून चांगली मागणी होत आहे. शिरगाव व वेंगुर्ला केंद्रातून प्रत्येकी १६ टन मिळून एकूण ३२ टन वाण बियाण्यांची विक्री झाली आहे.‘रत्नागिरी ८’ वाणाबराेबरच कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या ‘रत्नागिरी - ७’ या लाल भाताच्या सुधारीत वाणालाही चांगली मागणी आहे. दुर्लक्षित राहिलेल्या लाल भाताचे आरोग्यदृष्ट्या याचे महत्त्व लक्षात आल्याने लाल भाताच्या लागवडीकडे कल वाढला आहे. लहान मुले, गरोदर माता, रुग्णांसाठी लाल भाताची पेज पौष्टिक आहे. १२० ते १२५ दिवसांत हे वाण तयार होते. खोडातील लवचितकतेमुळे जमिनीवर पडून लोळण्याचा धोका नाही. शिवाय उत्पादकताही जास्त देणारे वाण असल्याने मागणी होत आहे.
शिरगाव संशोधन केंद्रात सातत्याने नवनवीन संशोधन सुरू असते. रत्नागिरी ६ ते ८ या वाणांना जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रासह अन्य राज्यातून पसंती मिळाली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वाण उपलब्ध करून देण्यात आले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन केंद्रावर एकूण ३२ टन बियाण्यांची विक्री झाली आहे, ही बाब समाधानकारक आहे. - विजय दळवी, संशोधन अधिकारी, कृषी संशोधन केंद्र शिरगाव.