रत्नागिरी : काेराेनाकाळात जिल्ह्यातील नमन कलावंतांचे १९२ प्रस्ताव मंजूर झाले होते. अजूनही रत्नागिरी, संगमेश्वर व राजापूर या तालुक्यातील नमन कलावंतांचे ३४० प्रस्ताव उशिरा पोहोचल्यामुळे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ते प्रस्ताव शासनाकडून तातडीने मंजूर केले जावेत, अशी मागणी नमन लाेककला रत्नागिरी जिल्हा संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.रत्नागिरी दाैऱ्यात मंत्री उदय सामंत यांची नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या तालुका शाखेच्या शिष्टमंडळाने पाली येथील निवासस्थानी भेट घेण्यात आली. या भेटीत लाेककलावंतांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, जिल्हा संघटनेतील ज्येष्ठ सदस्य श्रीधर खापरे, सुरेश होरंबे, हरिश्चंद्र बंडबे, विश्वनाथ गावडे, तालुका संघटना सदस्य वसंत साळवी, श्रीकांत बोंबले उपस्थित होते.‘नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संघटनेने नमन आणि जाखडी या लोककलांना राज्य शासनाने मान्यता द्यावी, या कलेला राजाश्रय मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली हाेती. ही मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मान्य झाली आहे.जिल्ह्यातील नमन कलावंतांच्या आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या मागण्या मार्गी लागल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ज्येष्ठ नमन कलावंतांचे ५४ मानधन प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाले आहेत. मात्र, अजूनही ३४० प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत; पण हे मानधन प्रस्ताव मंजूर करताना यापुढे रत्नागिरी जिल्ह्यातून असलेली ज्येष्ठ कलावंतांची १०० ची मर्यादा ५०० करावी, अशी मागणी केली आहे.
कोरोनाकाळात रत्नागिरी जिल्ह्यातील नमन कलावंतांचे ३४० प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
By अरुण आडिवरेकर | Published: October 09, 2023 7:04 PM