रत्नागिरी : शासकीय विविध कल्याणकारी योजनांचा सर्वसामान्याना लाभ मिळावा यासाठी रत्नागिरीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी (२५ मे) करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून लाभार्थींना आणण्यासाठी एसटीच्या ३५३ गाडयांचे आरक्षण करण्यात आले होते.
शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला लवकरात लवकर योजनांचा लाभ मिळावा हे प्रमुख उद्दिष्ट असून जिल्ह्यात आतापर्यंत ९० हजार जणांपैकी ५२ हजार जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. गुरूवारी (२५ मे) एकूण २५ हजार जणांना लाभ देण्यात आला. आपले सरकार कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून लाभार्थींना आणण्यासाठी एसटीची व्यवस्था करण्यात आली होती.
मंडणगड तालुक्यातून २०, दापोली २५, खेड ४०, चिपळूण ५०, देवरूख ५०, रत्नागिरी ६०, गुहागर ३०, लांजा १८, राजापूर तालुक्यातून ६० मिळून एकूण ३५३ एसटीच्या गाड्या प्रशासनाकडून आरक्षित करण्यात आल्या होत्या. प्रत्येक तालुक्यातून लाभार्थींना रत्नागिरी आणून प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सोडण्यात आले. त्यानंतर सर्व गाड्या चंपक मैदान येथे तात्पुरते वाहन तळ तयार करून तेथे लावण्यात आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथून त्या त्या तालुक्यातील लाभार्थींना घेवून रवाना होणार आहेत. शासनाच्या या उपक्रमामुळे एसटीच्या उत्पन्नात ५० ते ६० लाखाची भर पडणार आहे.